
शाळेतून घरी जाणाऱ्या चिमुकलीवर स्कूल व्हॅनमध्येच नराधम चालकाने लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणाचे बदलापुरात संतप्त पडसाद उमटले. धक्कादायक बाब म्हणजे ती चिमुकली ज्या इंग्रजी प्री स्कूलमध्ये शिकत होती ‘ती’ शाळाच अनधिकृत असून या संपूर्ण प्रकरणाची बाल हक्क आयोगाने गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली आहे. बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला कल्याणच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला मंगळवार, 27 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.
बदलापूरमधील एका नामांकित शाळेमध्ये 12 ऑगस्ट 2024 विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे पोलिसांनी एन्काऊंटर केले. या घटनेने संपूर्ण देश अस्वस्थ झाला होता. गुरुवारी पुन्हा अशाच घटनेची पुनरावृत्ती झाली. बदलापूरच्या पश्चिम भागात राहणारी चार वर्षांची चिमुकली स्कूल व्हॅनमधून घरी जात असताना चालकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत तिने हा प्रकार आईला सांगितल्यानंतर पालकांनी थेट पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी या घटनेची शहानिशा करून नराधमाला अटक केली असून, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या घटनेमुळे संतप्त बदलापूरकर पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. संतप्त नागरिकांनी आंदोलन करू नये म्हणून रेल्वे स्थानकावर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
स्कूल व्हॅनचा परवाना रद्द
जी व्हॅन शाळेतील विद्यार्थ्यांना ने-आण करीत होती त्या व्हॅनला स्कूल व्हॅनचा दर्जाच नव्हता. ही बाब लक्षात येताच आरटीओच्या अधिकाऱ्यांनी तातडीने परवाना रद्द केला असून व्हॅनची फॉरेन्सिक तपासणीदेखील केली आहे. तसेच 24 हजार रुपयांचा दंडदेखील ठोठावला आहे. व्हॅनमध्ये जीपीएस प्रणालीदेखील बसवलेली नव्हती, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली.
शहरात अनधिकृत शाळा किती?
बदलापूर शहरात दिवसेंदिवस अनधिकृत शाळांचे पेव वाढत चालले आहे. प्री स्कूलच्या नावाखाली विद्यार्थी व पालकांकडून भरमसाट पैसे उकळले जातात, मात्र मुलांची कोणतीही काळजी घेण्यात येत नाही. शहरातील अनधिकृत शाळांची यादी त्वरित जाहीर करावी, अशी मागणी गट शिक्षणाधिकारी विशाल पोतेकर यांच्याकडे बैठकीत करण्यात आली.
n या प्रकारानंतर राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अधिकारी आज बदलापूरमध्ये दाखल झाले व त्यांनी चौकशी सुरू केली आहे. त्यांनी गट शिक्षण अधिकारी व संबंधित शाळा प्रशासनाच्या सोबत बैठक घेतली. ‘ती’ शाळाच अनधिकृत असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे.
n दरम्यान, शिक्षणाधिकारी कोणतीही जबाबदारी घेण्यास तयार नसल्याचे दिसून आले. अत्याचाराची घटना मानवतेला काळिमा फासणारी असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा बालहक्क आयोगाचे सचिव लक्ष्मण राऊत यांनी दिला.























































