
मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार या गावी 25 डिसेंबर रोजी एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली होती. याबाबतचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतर दोन्ही मुलांनी आपल्या आई-वडिलांच्या आजारपणाला कंटाळून त्यांचा गळा दाबून खून केला व स्वतः रेल्वेखाली येवून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. याबाबत बारड पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
बारड पोलीस ठाण्याच्या हद्दीत जवळा मुरार येथे 25 डिसेंबर रोजी एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळून आले होते. आई-वडिलांनी गळफास घेतल्याचा दिखावा दिसून येत होता. तर त्यांची दोन मुले रेल्वेखाली येवून त्यांनी आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत होते. याबाबत या चौघांचेही शवविच्छेदन केल्यानंतर रमेश होनाजी लखे व राधाबाई रमेश लखे या दोघा पती-पत्नीचा त्यांचीच मुले उमेश व बजरंग यांनी त्यांच्या सततच्या आजारपणाला कंटाळून त्यांचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर पोलिसांनी याबाबत खुनाचा गुन्हा दाखल केला असून, यात दोन्ही आरोपी त्यांची दोन्ही मुले आहेत. मात्र ते मयत झाले आहेत. या प्रकरणामुळे एकच खळबळ माजली होती व लखे कुटुंबियाबद्दल गावात हळहळ व्यक्त होत होती. मात्र शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यांनतर रमेश लखे व राधाबाई लखे या दोघांचाही गळा दाबून खून करण्यात आल्याचे समोर आले आहे.
खून झाल्यानंतर या दोन्ही मुलांनी मुगट रेल्वेस्टेशनच्या धावत्या रेल्वेसमोर येवून आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. घडलेल्या घटनेबद्दल एकच खळबळ उडाली असून, आई-वडिलांच्या सततच्या आजारपणाला लागणार्या खर्चाला कंटाळूनच मुलांनीच त्यांचा गळा दाबून खुन केल्याचे स्पष्ट झाल्याचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय मंठाळे यांनी सांगितले आहे. याबाबत मंठाळे हे अधिक तपास करीत आहेत.





























































