
अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) गावच्या हद्दीत भोर मळा रोडलगत डिंभे उजवा कालवा परीसरात शाळेत जाणाऱ्या दहावीच्या विद्यार्थिनीच्या तोंडावर अज्ञात दोन जणांनी मिरची पावडर टाकल्याची घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वीही याच रस्त्यावर याच विद्यार्थिनीच्या बहिणीच्या अंगावर अज्ञात व्यक्तींनी स्प्रे मारल्याचीही घटना घडली होती. या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत विद्यार्थी व पालकांना धीर देत कोणी संशयस्पद व्यक्ती आढळल्यास मंचर पोलीस ठाण्याची संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
अवसरी ता.आंबेगाव येथील श्री भैरवनाथ विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी भोरवाडी, तांबडेमळा येथून अनेक विद्यार्थी येतात. बुधवारी दहावीची एक विद्यार्थिनी तिच्या मैत्रिणीसोबत सायकलवर शाळेत जात असताना भोरवाडी कॅनॉललगत तांबडेमळा येथे नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवर तोंड बांधून आलेल्या दोनजणांनी त्यांना अडवले. मुलीने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मुलीची सायकल ओढली आणि तिच्या तोंडावर व डोळ्यात मिरची पावडर टाकली. त्या दोघींनी आरडाओरडा केला असता ते दोघेजण पळून गेले. मिरची पावडर टाकलेल्या मुलीच्या बहिणीच्या अंगावर स्प्रे मारण्याची घटनाही याच रस्त्यावर काही दिवसांपुर्वी घडली होती. दुचाकीवर आलेल्या व्यक्ती कोण आहेत, त्या कोठून येतात, ते असे का करतात, याबाबत अद्याप कुठलीही माहिती मिळालेली नाही. मात्र तांबडेमळा भोरवाडी रस्त्यावर घडलेल्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
श्री भैरवनाथ विद्यालयाचे प्राचार्य डी.डी.जाधव यांनी याबाबत मंचर पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे, पोलीस उप निरीक्षक सोमशेखर शेटे, पोलीस हवालदार दिलीप भोईर, नंदकुमार आढारी, संजय नाडेकर, उपसभापती संतोष भोर, प्रशांत अभंग, कल्याण टेमकर, सरपंच कमलेश शिंदे, सचिन ढोणे, रामदास भोर, पोलीस पाटील अमित भोर, निलेश टेमकर, कल्याण शिंदे, सुरेंद्र भोर, शिवदास भोर यांनी घटनास्थळी भेट देत विद्यार्थी, पालक, शिक्षक, यांच्याशी चर्चा करत पाहणी केली आहे. मिरची पावडर टाकलेल्या विद्यार्थिनीला प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेऊन उपचार करण्यात आले आहे. दरम्यान अवसरी येथे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांनी एकजुटीने शाळेत यावे. रस्त्याला, घराच्या आजूबाजूला कोणतीही अनोळखी व्यक्ती दिसल्यास पालकांना, पोलीस पाटील, मंचर पोलीस यांना कळवावे. शिक्षकांनी शालेय विद्यार्थ्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात, शक्य असल्यास पुढील काही दिवस पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत सोडावे, असे आवाहन मंचर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. भोरवाडी तांबडे मळा येथून अवसरी खुर्द येथे विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. विद्यार्थी येत असलेल्या रस्त्याच्या आजूबाजूला झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने अशा घटना घडत असून अवसरी खुर्द ग्रामपंचायत यांच्या वतीने जेसीबीच्या साह्याने रस्त्याच्या आजूबाजूची झाडे झुडपे काढून परिसर स्वच्छ करण्याचे काम सुरू केले असल्याची माहिती सरपंच कमलेश शिंदे यांनी दिली.




























































