चिमूरच्या शाळेत विद्यार्थिनींना अमानुष शिक्षा करणाऱ्या मुख्याध्यापिकेची बदली

961

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरमधील मुलींच्या निवासी शाळेत 38 मुलींना अमानुषपणे दंडबैठकांची शिक्षा देणाऱ्या मुख्याध्यापिकेची सोमवारी तातडीने गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा इथे बदली करण्यात आली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी गेलेल्या पथकाने शासनाला आपला अहवाल पाठवला. या अहवालानुसार कारवाई समाज कल्याण विभाग करणार आहे. या अहवालात संबंधित मुख्याध्यापिकेवर प्रशासकीय कारवाई सुचवण्यात आली आहे. मुख्याध्यापिका दूशीला मेश्राम यांना तत्काळ प्रभावाने शाळा सोडण्याचे आदेश देण्यात आले असून मंगळवारीच सिरोंचा इथे प्रतिनियुक्तीवर हजर होण्याचे आदेश समाज कल्याण विभागाने दिले आहेत.

जिन्यावर चढताना पावलांचा मोठ्याने आवाज केला म्हणून मुख्याध्यापिकेने अनुसुचित जाती, नवबौद्ध मुलींच्या निवासी शाळेतील दहावीतील 38 मुलींना सुमारे दीडशे दंडबैठका करण्याची शिक्षा दिली होती. यामुळे मुलींच्या पायांना सूज आली होती. त्यांना उभे राहणे आणि चालणेही कठीण झाले होते. शिक्षा केलेल्या सहा मुलींची प्रकृती अजूनही सुधारलेली नाही. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे अमानुष शिक्षेचे प्रकरण उघड होताच राज्यात खळबळ उडाली. त्यामुळे सोमवारी समाज कल्याण अधिकारी प्रसाद कुलकर्णी यांनी शाळेला भेट देऊन प्रकरणाची चौकशी केली. पालक आणि मुलींचे म्हणणे समजून घेण्यात आले. या चौकशीचा अहवाल शासनाला पाठवण्यातही आला आहे. ही शाळा शासकीय असून समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून ती संचालित केली जाते. या शाळेत इयत्ता सहा ते दहावीपर्यंत 195 मुली शिक्षण घेत आहेत. हा सगळा प्रकार 18 फेब्रुवारी रोजी घडला होता.

आपली प्रतिक्रिया द्या