अरुणाचल सीमेजवळील पूर्व भूतानवर विस्तारवादी चीनची नजर

660

विस्तारवादी भूमिकेमुळे चीनचे 24 देशांशी सीमावाद आहेत. त्यात चीन आता शेजारी देशांच्या ताब्यातील भूभागावरही दावा करत असल्याने या वादांमध्ये भरच पडत आहे. आता चीनने भूतानमधील पूर्वेकडील भूभागावर दावा केला आहे. भूतानचा हा भूभाग अरुणाचल प्रदेशच्या सीमेला लागून आहे. त्यामुळे चीनचा हा दावा हिंदुस्थानसाठीही महत्त्वाचा आहे. हिंदुस्थानच्या अरुणाचल प्रदेशवरही चीन दावा करत आहे. भूतानशी असलेल्या सीमावादात नेहमी मध्य आणि पश्चिम सीमावादावर चर्चा झाली आहे. मात्र, आता लडाखमध्ये हिंदुस्थानशी वाढलेला तणाव आणि अरुणाचल प्रदेशवर असलेली नजर यामुळे चीनने हा नवा दावा केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भूतानशी असलेला सीमावाद संपला नसून त्यावर चर्चा सुरू असल्याचे चीनने म्हटले आहे. भूतानशी पूर्व, मध्य आणि पश्चिम भूभागावरून सीमावाद आहे. भूतान आणि चीनच्या सीमावादात तिसऱ्या देशाने हस्तक्षेप करू नये, असे हिंदुस्थानचे नाव न घेता चीनने सूचित केले आहेत. हिंदुस्थान आणि भूतानचे मैत्रीपूर्ण संबंध लक्षात घेत चीनने ही भूमिका घेतली आहे. भूतानने मात्र चीनचा भूभागावरील हा दावा फेटाळून लावला आहे. भूतान आणि चीनमध्ये पूर्वेतील भूभागाबाबत कधीही चर्चा झालेली नाही. दोन्ही देशात पूर्व आणि मध्य भूभागातील सीमरेषेवरून वाद असल्याचे भूतानने स्पष्ट केले आहे. चीनने पूर्व भागावर नव्याने दावा केला आहे. त्यांनी हा मुद्दा याआधी कधीही उपस्थित केलेला नाही, असे भूतानने म्हटले आहे.

सीमावाद सोडवण्यासाठी 1984 ते 2016 या काळात भूतान आणि चीनमध्ये बैठकीच्या 24 फेऱ्या झाल्या आहेत. त्या बैठकांमध्ये पश्चिम आणि मध्य भूभागाबाबत चर्चा करण्यात आली होती. त्यामुळे भूतानच्या पूर्वेकडील भूभागावर चीनने नव्याने दावा केला आहे. दोन्ही देशांनी स्वाक्षरी केलेल्या दस्तावेजांवरही फक्त मध्य आणि पश्चिमी भूभागावरील वादाचा उल्लेख आहे. याआधी जून महिन्यात चीनने भूतानच्या साकतेंग अभयारण्यावरील भूभागावर दावा केला होता. चीनच्या या दाव्यालाही भूतानने विरोध केला होता. हे अभयारण्य भूतानचा अभिन्न भाग असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते.

हिंदुस्थान आणि भूतानचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. 2007 मध्ये दोन्ही देशांमध्ये सहकार्य करार झाला आहे. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानला भेट दिली होती. तसेच शेजारी देशांशी चांगेल संबंध प्रस्थापित करण्यावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले होते. हिंदुस्थान आणि भूतानमधील दृढ होत असलेली मैत्री चीनला खूपत होती. तसेच चीनने अरुणाचल प्रदेशमधील डोकलाम आणि आता लडाखमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला होता. त्यात अपयश आल्यावर आता चीनने अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या भूतानच्या भूभागावर दावा केला आहे. त्यामुळे या वादाकडे हिंदुस्थानने नजर ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या