खोऱ्यातील नदीत लाल माकडांच्या गटांगळ्या; चीनने गलवानच्या संघर्षात 4 नव्हे 42 सैनिक गमावले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दोन वर्षांपूर्वी जून 2020 मध्ये गलवान खोऱयातील संघर्षात हिंदुस्थानने चीनला जबर झटका दिल्याचा आणखी एक धडधडीत पुरावा जगापुढे आला आहे. गलवानच्या संघर्षात केवळ चार सैनिक शहीद झाल्याचा कांगावा करणाऱया चीनने प्रत्यक्षात 42 सैनिक गमावले होते. यातील चौघे गोळीबारात मारले गेले, तर 38 जण गलवानच्या नदीत गटांगळ्या खात वाहून गेले, असा खळबळजनक दावा करीत ऑस्ट्रेलियातील ‘द क्लाक्झॉन’ या वृत्तपत्राने चीनच्या खोटेपणाची पोलखोल केली आहे.

चीनने पूर्व लडाखमधील गलवानच्या संघर्षात आपले किती सैनिक मारले गेले, याबाबत सुरुवातीला काहीच वाच्यता केली नव्हती. नंतर गलवानमध्ये एकूण 4 सैनिक शहीद झाल्याचे कबूल केले. गेल्या वर्षी या सैनिकांना पदक देण्याची घोषणा केली. पण तेही अर्धसत्य असल्याचे ‘द क्लाक्झॉन’ने उघड केले आहे. या वृत्तपत्राने गलवान संघर्षातील नेमके सत्य उजेडात आणण्यासाठी सोशल मीडिया संशोधकांची एक स्वतंत्र टीम बनवली होती. या टीमने जवळपास दीड वर्ष गलवान संघर्षाबाबत संशोधन केल्यानंतर ‘गलवान डिकोडेड’ नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

गलवान खोऱयात चीन आणि हिंदुस्थानमध्ये संघर्ष झाला, त्या रात्री चीनच्या पीपुल्स लिबरेशन आर्मीचे (पीएलए) तब्बल 38 सैनिक गलवान नदीत वाहून गेले, असा धक्कादायक गौप्यस्पह्ट अहवालात करण्यात आला आहे. चीनने मात्र सैन्याच्या झालेल्या या मोठय़ा हानीचे सत्य अजूनपर्यंत झाकून ठेवले होते. त्यामुळे पुन्हा एकदा चीनचा खोटेपणा जगापुढे आला आहे.

चीनने केवळ चार सैनिक शहीद झाल्याचे कबूल करून इतर 38 सैनिकांच्या मृत्यूची बातमी अंधारात ठेवली. या माध्यमातून चीनने आपल्याच सैनिकांचा अपमान केला आहे. यापूर्वी अमेरिकेतील ‘न्यूज वीक’ वृत्तपत्रानेही चीनच्या खोटेपणाचे पितळ उघड केले होते. गलवानमधील 15 जूनच्या संघर्षात 60हून अधिक सैनिक मारले गेल्याचा दावा ‘न्यूज वीक’ने केला होता.

गलवानमधील संघर्षानंतर जगभरातील सर्व प्रमुख देशही अॅलर्ट झाले. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान व हिंदुस्थान या देशांदरम्यान बनवण्यात आलेल्या ‘सिक्युरिटी अलायन्स क्वाड’ला तत्काळ मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू झाले. चारही देशांनी मार्च 2021मध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. चीनकडून सुरक्षेला वाढता धोका असल्याच्या पार्श्वभूमीवरच ‘क्वॉड’ची स्थापना केलेली आहे.

सत्य झाकण्यासाठी चीनकडून दोन फोटोंची जुळवाजुळव

चीनने गलवानमधील सत्य झाकण्यासाठी दोन वेगवेगळ्या घटनांचे फोटो परस्परांना जोडले. हिंदुस्थानला डिवचणे किती महागात पडले हे जगाला कळू नये म्हणून चीनने गलवानमध्ये केवळ 4 सैनिक शहीद झाल्याचे मान्य केले. वास्तविक 15 आणि 16 जूनच्या रात्री शून्य अंशांपेक्षा कमी तापमानात अंधारात चीनचे 38 सैनिक गलवान नदीत वाहून गेले होते. हे प्रमाण चीनने कबूल केलेल्या संख्येपेक्षा नऊपटीने अधिक आहे. यापूर्वी चीनच्या ‘विबो’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनेसुद्धा हे सत्य जाहीर केले होते. परंतु नंतर चिनी अधिकाऱयांनी यासंबंधी सर्व पोस्ट हटवल्या होत्या.