
चीनमध्ये उद्भवलेल्या कोरोना विषाणूने आता इटलीमध्ये हाहाकार उडवून दिला आहे. इटलीमध्ये गुरुवारी आणखी 427 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्यामुळे बळींची संख्या 3,405 वर गेली आहे. चीनमध्ये कोरोनाने 3,245 लोकांचा बळी घेतल्याची अधिकृत आकडेवारी आहे. चीनच्या तुलनेत इटलीमध्ये अत्यंत भयानक स्थितीत कोरोना फैलावला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने लॉकडाऊन तसेच इतर कठोर पावले उचलली आहेत.
कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेऊन इटलीने 12 मार्चपासूनच लॉकडाऊन केले असून याची मुदत अनिश्चित काळासाठी वाढवली आहे. इटलीमध्ये सरकार कोरोनाचा फैलाव थोपवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतेय. मात्र देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढतीच असून बळी जाण्याचे प्रमाण थांबलेले नाही. या ठिकाणी 41 हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
इटलीला उशिराने जाग, आता मृत्यूचे तांडव
कोरोनाचा हळुहळू फैलाव होत असताना इटलीचे प्रशासन सुस्त राहिले होते. मात्र बळींची संख्या वाढू लागताच स्थानिक आरोग्य प्रशासन खडबडून जागे झाले. तोपर्यंत हजारो लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे आता या ठिकाणी मृत्यूचे तांडव सुरू झाले आहे.
कॅलिफोर्नियात लॉकडाऊन
अमेरिकेतील सर्वच 50 राज्यांत कोरोनाची दहशत वाढली आहे. वॉशिंग्टनमध्ये सर्वाधिक 74 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच 3 कोटी 90 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या कॅलिफोर्नियात 1060 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 19 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कॅलिफोर्नियात पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले आहे.
चीनमधून कोरोना गायब, सलग दुसऱया दिवशी नवा रुग्ण नाही
डिसेंबरमध्ये सर्वप्रथम कोरोनाचा विषाणू आढळलेल्या चीनने या संकटावर मात केली आहे. वुहान शहरात सलग दुसऱया दिवशी एकही नवीन कोरोना रुग्ण आढळला नाही. चीन सावरला असतानाच आता आजूबाजूच्या देशांनी आपल्या सीमा सील केल्या आहेत.
विषाणूची जगातील दहशत
जगभरात 158 देशांमध्ये कोरोना विषाणूचे 2 लाख 32 हजार 650 हून अधिक रुग्ण आढळले आहेत, तर 9,800 अधिक लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
प्रान्समध्ये गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूच्या 108 नवीन बळींची नोंद झाली. त्यामुळे येथील एकूण बळींची संख्या 372 वर गेली आहे.





























































