
हिंदुस्थान आणि चीनमध्ये पूर्व लडाखमध्ये सुरू असलेल्या वादादरम्यान चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अर्थात देशाचे संरक्षणप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी केलेल्या एका विधानावर चीनने थयथयाट सुरू केला आहे. हिंदुस्थानचा क्रमांक एकचा शत्रू पाकिस्तान नाही तर चीन आहे, असे स्पष्ट मत बिपीन रावत यांनी व्यक्त केले होते. या विधानावर चीनने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. चीनच्या रक्षामंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल वू कियान यांनी हे बेजबाबदार विधान असून यामुळे संघर्ष वाढणार असल्याचे म्हटले आहे.
चीनची राजधानी बिजिंगमध्ये आयोजित एका ऑनलाईन पत्रकार परिषदेमध्ये बोलताना कर्नल वू कियान म्हणाले की, हिंदुस्थानचे अधिकारी कोणत्याही आधारांविना चिनी सैन्याकडून धोका असल्याचे मत मांडत आहे. हे बेजबाबदारपणाचे विधान आहे. हिंदुस्थान आणि चीन सीमेवर चीनची भूमिका स्पष्ट असून सीमाभागात शांततेतासाठी चीन प्रतिबद्ध असल्याचेही ते म्हणाले.
तसेच चीन सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. परंतु सीमारेषेवरील तनाव कमी होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असेही कर्नल वू कियान म्हणाले. यादरम्यान त्यांनी एक चिनी वाक्प्रचारही सांगितला. काचेचा उपयोग तुम्ही आरशासारखा केला तर तुम्हाला तयार होण्यासाठी वेळ मिळेल, परंतु याचा उपयोग इतिहासात बघण्यासाठी केला तर तुम्ही स्वत:चे अध:पतन रोखू शकता, असे म्हणत त्यांनी एकप्रकारे हिंदुस्थानला 62 च्या युद्धाचीच आठवण करून दिली.
रावत काय म्हणाले?
हिंदुस्थानचा क्रमांक एकचा शत्रू पाकिस्तान नाही तर चीन आहे, असे स्पष्ट मत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अर्थात देशाचे संरक्षणप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी व्यक्त केले. भविष्यात हिंदुस्थानला दोन्ही आघाड्यांवर या शत्रूंना तोंड द्यावे लागू शकते, असेही जनरल रावत यांनी सांगितले. एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात जनरल रावत बोलत होते.



























































