
सामना ऑनलाईन । हैदराबाद
आतापर्यंतची युद्धे सीमारेषेवर आमनेसामने लढण्यात येत होती. मात्र, आगामी काळात युद्धाची पद्धत बदलणार आहे. आगामी काळात बंदुका, तोफा यांच्याऐवजी सायबर युद्धे लढण्यात येणार आहेत. चीनने याची जोरदार तयारी सुरू केली असून त्यांनी यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केल्याचे लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी सांगितले. आपल्याला या नव्या पद्धतीच्या युध्दासाठी तयार राहवे लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. आपल्याला आपली ताकद वाढवण्यासाठी लष्कारात आर्टिफिशयल इंटेलिजन्स आणि बिग डेटा कंप्युटिंगचा समावेश करावा लागेल असे त्यांनी सांगितले. संरक्षण निर्माण आणि आत्मनिर्भरता या विषयावरील राष्ट्रीय संमेलनाच्या समारोपावेळी रावत यांनी हे मत व्यक्त केले.
आपल्या भाषणात रावत यांनी आर्टिफिशयल इंटेलिजन्सच्या वापरावर अधिक जोर दिला. या नव्या तंत्रज्ञानाची गरज आणि त्याचा वापर करण्याची क्षमता विकसीत होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सायबर युद्धाच्या क्षेत्रात चीन खूप पुढे निघून गेला आहे. त्यामुळे आता आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. या क्षेत्रात मागे राहून चालणारे नाही. या तंत्रज्ञानाच्या वापरावर लक्ष केंद्रीत करण्याची वेळ आता आली आहे, असे ते म्हणाले. शत्रूला त्यांच्या भाषेत उत्तर देण्याची गरज असते. त्यामुळे आता बंदुका, तोफा यांच्याऐवजी सायबर युध्दे होणार आहेत. त्यासाठी आपण सक्षम असणे गरजेचे आहे.
पाकिस्तानकडून शांततेची अपेक्षा करणे व्यर्थ
पाकिस्तानकडून शांततेची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. अनेकदा समज देऊनही पाकिस्तानकडून कुरापती सुरुच आहे. आता त्यांच्या हातात स्नायपर गन आल्या आहेत. त्यामुळे सुरक्षा दलाच्या जवानांना सतर्कतेचे आदेश देण्यासह त्यांना काही सूचनाही केल्या आहेत. पाकिस्तानच्या कुरघोडींना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर द्यावा लागेल, असे ते म्हणाले. कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यात लष्कराचे जवान सज्ज असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.





























































