
पूर्व लडाखमध्ये सीमावाद सुरू झाल्यापासून चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने मोठय़ा प्रमाणात सैन्य तैनात केले होते. त्यानंतर तिथल्या थंडीमुळे सैन्य परत बोलवण्यात आले आहे. लडाख परिसरातील वाढत्या थंडीमुळे पीपल्स लिबरेशन आर्मीच्या 90 टक्के सैनिकांना परत पाठवले आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते मे या कालावधीनंतर चीनने लडाखच्या पूर्वेकडील हिंदुस्थानी हद्दीजवळ जवळपास 50,000 सैन्य तैनात केले होते. चीनने गेल्या वर्षी तैनात केलेल्या सैनिकांना परत पाठवण्यात आले असून त्या जागी आजूबाजूच्या परिसरातील नवीन सैन्य तैनात करण्यात आले आहे. गेल्यावर्षीच्या सैन्यातील 90 टक्के सैनिकांना परत बोलावण्यात आले आहे. वाढलेल्या थंडीमुळे निर्माण झालेली परिस्थिती अनुकूल नसल्याने हे माघारी बोलावण्यात आले आहे. हिंदुस्थानही दरवर्षी रक्त गोठवणाऱ्या थंडीत तिबेट सीमेवर तैनात 40 ते 50 टक्के सैनिकांना परत बोलावून त्यांच्या जागी नव्या दमाचे जवान पाठवत असतो.

























































