बंदी नंतरही टिकटॉक चर्चेत, पुन्हा एन्ट्री करण्यासाठी ‘या’ दोन कंपन्यांशी चर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टिकटॉकला (TikTok) हिंदुस्थानात पुन्हा प्रवेश करायचा आहे. यासाठी कंपनीचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. टिकटॉकची हिंदुस्थानातील मालमत्ता आणि व्यावसायिक हक्क जापानी कंपनी सॉफ्टबँक खरेदीची तयारी करत आहे. या करता कंपनीला एका हिंदुस्थानी कंपनीची भागीदारी आवश्यक असून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याआधी टिकटॉकची रिलायन्स जिओसोबत बोलणी सुरू असल्याचे बोलले जात होते आता मात्र आणखी एका कंपनीचे नाव यात जोडले गेले आहे. ही कंपनी म्हणजे भारती एअरटेल.

केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा आणि गोपनीयतेच्या कारणावरून टिकटॉकसहित 58 चिनी अॅप्सवर जुलैमध्ये बंदी घातली. ही कंपनी चीनी सरकारबरोबर युझर्सचा डेटा शेअर करत असल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. अमेरिकेतही टिकटॉकवर बंदीसाठी पाऊल उचलण्यात आली आणि तिथे देखील बर्‍याच टेक कंपन्याही त्यांचा व्यवसाय खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत. या कंपन्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

टिकटॉकची मुख्यकंपनी (पॅरेंट कंपनी) बाइटडान्समध्ये आधीपासूनच जपानी कंपनी सॉफ्टबँकची भागीदारी आहे. ब्लूमबर्गच्या मते, त्यांनी टिकटॉकचा देशातील व्यवसाय खरेदी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत आणि रिलायन्स जिओ इन्फोकॉम आणि भारती एअरटेलसोबत भागीदारी करण्यासाठी देखील चर्चा सुरू आहे. मात्र, जिओ आणि भारती एअरटेलने यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. सॉफ्टबँक इतर पर्यायही शोधत आहे.

जपानी कंपनी सॉफ्टबँकने ओला कॅब, स्नॅपडील, ओयो रूम्स सारख्या अनेक स्टार्टअप्समध्ये हिंदुस्थानात गुंतवणूक केली आहे. ऑगस्टच्या सुरुवातीला अशी चर्चा देखील सुरू झाली की रिलायन्स टिकटॉकचा हिंदुस्थानातील व्यवसाय खरेदी करू शकेल. मात्र त्यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती बाहेर आलेली नाही.