
सामना ऑनलाईन, चंदीगढ
दुर्गम आणि उंचावरील प्रदेशात शस्त्रास्त्रं आणि सैनिकांना वाहून नेण्याची क्षमता असलेल्या ‘चिनूक’ हेलिकॉप्टरचा हिंदुस्थानी हवाई दलात समावेश करण्यात आला आहे. ही हेलिकॉप्टर पाकिस्तानी सीमेवर तैनात करण्यात येणार आहेत. 2015 मध्ये हिंदुस्थानने अमेरिकेकडून 22 अपाचे आणि 15 चिनूक हेलिकॉप्टर खरेदी करण्याची डील केली होती.
चंदीगढ येथे सोमवारी पार पडलेल्या सोहळ्यात हवाईदल प्रमुख एअरचीफ मार्शल बी.एस.धनोआ यांच्या उपस्थितीत या हेलिकॉप्टरचा हवाईदलाच समावेश करण्यात आला. अमेरिकेसोबत हिंदुस्थानने 2.5 अरब डॉलरची डिल केली होती. या वर्षअखेरीस सर्वच्या सर्व हेलिकॉप्टर हवाईदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात येणार आहेत. रविवारी 4 चिनूक हेलिकॉप्टर गुजरातमधील कच्छच्या मुंद्रा एअरपोर्टवर दाखल झाली. अमेरिकेच्या बोईंग या विमान निर्माता कंपनीकडून ही हेलिकॉप्टर खरेदी करण्यात आली आहेत.
राफेलमुळे हिंदुस्थानची ताकद वाढणार
हिंदुस्थानच्या सुरक्षेचा प्रश्न सध्या गंभीर आहे. हवाईदलाला चिनूकची नितांत गरज होती. या हेलिकॉप्टरच्या सहाय्याने आपण हिमालयाच्या अतिविशाल आणि दुर्गम भागात सहज पोहोचू शकतो. ज्या दिवशी आपल्या ताफ्यात राफेल दाखल होईल त्यादिवशी पाकिस्तानचे कोणतेही विमान नियंरण रेषा आणि सीमेवर येणार नाही. राफेलमुळे हिंदुस्थानची ताकद वाढणार आहे– बी.एस.धनोआ, हवाईदल प्रमुख
- अपाचेचा वापर करणारा हिंदुस्थान 14 वा तर चिनूकचा वापर करणारा 19 वा देश ठरला आहे.
- 2018 मध्ये बोईंगने हवाईदलाचे पायलट आणि फ्लाईट इंजिनीयर्सना चिनूक हेलिकॉप्टर उडविण्याचे प्रशिक्षण दिले होते.
- व्हिएतनामच्या युद्धात चिनूक हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आलेला आहे.
- 11 हजार किलो शस्त्रास्त्र आणि सैनिकांना काहून नेण्याची क्षमता.
- मल्टीमिशन हेलिकॉप्टर; खोऱयांमध्ये तसेच छोटय़ा हेलिपॅडवरही लँड होते.
- 1962 पासून अमेरिकेच्या हवाईदलात चिनूकचा वापर
- खराब हवामानातही हे हेलिकॉप्टर उड्डाण घेऊ शकतो. याचा वेग ताशी 315 किलोमीटर इतका आहे.



























































