येत्या आठ ते दहा दिवसांत मुंबईहून चिपी विमानतळावर विमान उतरेल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिपी विमानतळाचे उद्घाटन कधी होणार याबाबत शंका व्यक्त केल्या जात आहेत. मात्र शुभारंभाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. असे असले तरी येत्या आठ ते दहा दिवसांत मुंबईहून विमान सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावर उतरेल आणि सिंधुदुर्गवरून मुंबईला जाईल, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे उद्घाटन 23 जानेवारी रोजी होणार असे निमंत्रणपत्रक व्हॉट्सऍपवर फिरू लागल्याने संभ्रम निर्माण झाला होता. विमानतळाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी चिपी विमानतळ प्रकल्पाची पाहणी करून उदय सामंत यांनी एक बैठक घेतली. याविषयीची माहिती पत्रकारांना देताना उदय सामंत म्हणाले, तांत्रिक बाबी पूर्ण करूनच विमानसेवा सुरू होईल. विमानतळाकडे येणारे रस्ते, परिसर सुशोभीकरण, केंद्राची सिक्युरिटी नसल्याने पोलीस अधिकारी किती लागतील? कॉन्स्टेबल किती लागतील? वेपनवाले पोलीस किती लागतील? सुरक्षा बोर्डाचे सुरक्षरक्षक किती पाहिजेत? याच्यावर आजच्या आढावा बैठकीत चर्चा झाली. विमान उड्डाण आणि लँडिंगसाठी जी यंत्रणा लागेल ती सर्व यंत्रणा सज्ज आहे. केंद्राकडून आवश्यक ती परवानगी मिळाली की विमानसेवा सुरू होईल.

या वेळी आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, विधानसभा संपर्प प्रमुख शैलेश परब, रुची विनायक राऊत, विकास कुडाळकर, अतुल बंगे आदी उपस्थित होते.

2 हजार 500 रुपयांत प्रवास
याविषयी अधिक माहिती देताना शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत म्हणाले, गेले चार दिवस दिल्ली येथील डीजीसीए, एअरपोर्ट ऑथोरिटी, अलायन्स एअरलाइन्स, टेक्निकल विभाग आदी पथकांनी या विमानतळाची बारकाईने तपासणी केली. त्यांनी केलेल्या सूचनेनुसार विकासक असलेली आयआरबी कंपनी आपला एटीआर सादर करेल, त्यानंतर विमानसेवा देणारी एअर अलायन्स कंपनीचे पथक पुन्हा विमानतळाची पाहणी करेल, त्याला 8 ते 10 दिवस जातील. केंद्राच्या उड्डाण योजनेत हा प्रकल्प असल्याने केवळ 2 हजार 500 रुपयांत प्रवाशांना मुंबईचा प्रवास करता येईल. केंद्रीय हवाई मंत्री हरदीपसिंग पुरी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा संपर्प सुरू आहे. केंद्राकडून आवश्यक ते सर्व सहकार्य मिळत आहे. पायाभूत सुविधांमध्ये लाईट, रस्ता, पाणी, टेलिफोन आदींची पूर्तता करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

राजकारण नाही, केंद्राकडून आवश्यक ते सहकार्य
चिपी विमानतळ उद्घाटनाची 23 तारीख ठरल्याचा जो कागद दाखवला जात आहे त्यावर चर्चा करण्यापेक्षा केंद्र शासनाचे एव्हिएशन मिनिस्टर आहेत त्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले आहे. दिल्लीच्या पथकाने चिपी विमानतळाची पाहणी केल्याचा अहवाल सोमवारी संध्याकाळपर्यंत दिल्लीला जाईल आणि काही सूचना असतील तर त्या पूर्ण करून दिल्या जातील. या प्रकल्पाला केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य आहे. चिपी विमानतळ प्रकल्प सुरू करणे हा सांघिक विषय असल्यामुळे यात कुठलेही राजकारण नाही, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

विमान सुरू करण्यासाठी आणखी दोन कंपन्या इच्छुक
या ठिकाणी सध्या तरी वीज व पाण्याची अडचण येणार नाही. खासदार विनायक राऊत यांच्या पुढाकाराने या ठिकाणी एक विमान सुरू होईल. अजूनही दोन कंपन्या इच्छुक आहेत. हा विमानतळ गोव्याला पर्याय ठरू शकतो. या विमानतळ प्रकल्पावर मुख्यमंत्री स्वतः लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली.