
कॅनव्हासवर विविध रंगांची उधळण करत निसर्गचित्र, महापुरुष किंवा राजकीय नेत्यांचे पोर्ट्रेट साकारणारे आजवर आपण अनेक चित्रकार पाहिले असतील. चिपळूणच्या विजय शिंदे या कलाकाराची मात्र बातच न्यारी आहे. पाण्याखाली जाऊन श्वास रोखत त्याने कोळसा आणि खडूच्या रंगांचा वापर करत दगडावर भगवान शंकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि विठ्ठलाचे चित्र साकारले आहे. विशेष म्हणजे ऑक्सिजन सिलिंडर किंवा स्विमिंग गॉगल्सचा अशा कोणत्याही स्विमिंग उपकरणांचा वापर तो करत नाही. त्याच्या या आगळ्यावेगळ्या कलेची नुकतीच ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ने दखल घेतली आहे.
चिपळूणचा विजय शिंदे हा पेशाने इंजिनीअर आहे. नोकरीचा राजीनामा देत त्याने सावर्डेत स्वतःचा आर्ट स्टुडिओ सुरू केला. आपल्या कलेविषयी विजय म्हणाला, लॉकडाऊनमध्ये मी आमच्या कुशीवडे या गावी परतलो. येथील जयगड नदीत मी रोज पोहायला यायचो. त्याचवेळी मला दगडावर चित्र काढण्याची कल्पना मला सुचली. मग ती कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी मी मेहनत घेतली. पाण्याखाली जाऊन चित्र काढताना माझ्यासमोर तीन प्रकारची आव्हाने होती. पाण्यात आपण जास्तवेळ डोळे उघडे ठेवू शकत नाही, पाणी प्रवाही असल्यामुळे एकाच जागी स्थिर उभे राहू शकत नाही आणि तिसरे म्हणजे पाण्यात अधिक वेळ श्वास रोखणे. या सर्व आव्हानांवर मात करत मी पाण्याखाली चित्रकलेचा सराव केला.
6 मे रोजी विजयने जयगड नदीत पाण्याखाली तीन फूट जाऊन एका दगडावर भगवान शंकराचे चित्र साकारले होते. या चित्रासाठी त्याला 43 मिनिटांचा वेळ लागला होता. यादरम्यान श्वास घेण्यासाठी त्याला 73 वेळा पाण्याबाहेर यावे लागले. त्यानंतर शिवराज्याभिषेक दिनानिमित्त त्याने याच ठिकाणी 1 तास 39 मिनिटांत छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र साकारले होते. त्यादरम्यान 163 वेळा त्याला पाण्याबाहेर श्वास घेण्यासाठी यावे लागले होते. हे दोन्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर अवघ्या 25 मिनिटांत त्याने पाण्याखाली विठ्ठलाचे चित्र साकारले असून या चित्राची दखल ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ने घेतली आहे.

























































