चिपळूणच्या पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनच्या धनश्री शिंदे बिनविरोध

799

चिपळूण येथील पंचायत समितीत महाविकास आघाडी झाल्याने सभापती, उपसभापतीच्या निवडी बिनविरोध झाल्या. सभापतीपदी शिवसेनेच्या धनश्री शिंदे यांची तर उपसभापती राष्ट्रवादी काँग्रेसचे पांडुरंग माळी यांची निवड झाली. या दोघांना एक वर्षाचा कालावधी मिळणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी प्रविण पवार यांनी काम पाहीले.

राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर ग्रामीण स्तरावर महाविकास आघाडीला सुरुवात झाली. पालिकेतील विषय समित्यांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी झाल्यानंतर पंचायत समितीतही ती झाली. आमदार शेखर निकम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्यासह पदाधिकार्‍यांमध्ये झालेल्या बैठकीत सभापती निवडीसाठी महाविकास आघाडीवर शिक्कामोर्तब झाले. त्यानुसार सभापती, उपसभापती पदाच्या निवडी बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. चिपळूण पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी 9 सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्व सदस्य सभापती पूजा निकम यांना पुन्हा संधी मिळण्यासाठी आग्रही होते. मात्र आमदार शेखर निकम यांनी त्यास ठाम नकार दिला होता. त्यामुळे रिया कांबळे यांच्या नावावर शिक्कमोर्तब झाले होते. बिनविरोध निवडीचा निर्णय झाल्याने सर्व सदस्यांच्या उपस्थितीत सभापती पदासाठी शिवसेनेच्या धनश्री शिंदे यांनी तर उपसभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रसचे पांडुरंग माळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेसला पुढील वर्षी सभापतीपदी संधी मिळणार आहे. कापसाळ गणाच्या रिया कांबळे यांना सभापतीपदाची संधी देण्याचे राष्ट्रवादीच्या बैठकीत ठरले आहे. दुपारनंतर निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी बिनविरोध निवडीचा निकाल जाहीर केला. नवनिर्वाचीत सभापती, उपसभापती यांना शुभेच्छा देण्यासाठी दोन्ही पक्षातील पदाधिकार्‍यांनी हजेरी लावली होती.

आपली प्रतिक्रिया द्या