आंबा मोहर करपला,शेतकऱ्यांचा आनंद हरपला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। चिरनेर

भातशेतीमध्ये दरवर्षी तोटा होत असल्याने चिरनेर विभागातील शेतकऱ्यांनी हापूस आंब्यांची बागायत शेती मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे.यावर्षी आंबे बागायती मोहराने फुलून गेल्या होत्या.पर्यायाने आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होईल या आनंदात शेतकरी असतानाच बदलत्या हवामानामुळे या बागायतींवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने आंब्याचा मोहर पार करपून गेला आहे. यामुळे भरघोस आंबा उत्पादन होईल या आनंदात असलेल्या शेतकऱ्यांचा आनंद मोहराबरोबरच मावळला आहे.या आस्मानी संकटाने बळीराजा पार हवालदिल झाला आहे.

कोकणातील भातशेती सध्या तोट्याचा व्यवसाय झाला आहे. उत्पादनापेक्षा खर्च जास्त होत असल्याने शेतकऱ्यांनी भातशेती ऐवजी आंबा बागायत शेती करण्यावर भर दिला आहे. त्याअनुरूप चिरनेर विभागातील शेतकऱ्यांनी भातशेतीत आंब्याची झाडे लावून अनेक बागायती निर्माण केल्या आहेत.ही आंब्याची कलमे या वर्षी ऐन भरात येऊन त्यांना जोमदार मोहर आला होता.यावर्षी आंब्याचे भरघोस उत्पादन येऊन चांगला नफा मिळेल या आनंदात चिरनेर विभागातील शेतकरी होता.मात्र वातावरणात अचानक मोठ्या प्रमाणात गारवा आल्याने हवेत आद्रता येऊन दवाचे प्रमाणही जास्त वाढले.पर्यायाने हवेत दमटपणा आल्याने तुडतुडे या किटकांनी आंबामोहरावर हल्ला करून त्याचा रस शोषून घेतला.त्याचबरोबर तुडतुड्याची विष्ठा आंबामोहरावर पडल्याने त्यावर बुरशी मोठ्या प्रमाणात वाढल्याने आंबा मोहर काळवंडून गेला.पर्यायाने आंबामोहराची फळधारणा पूर्णता थांबली.

त्यामुळे आंबा उत्पादन मोठ्या प्रमाणात येऊन मोठा नफा मिळेल या स्वप्नात असलेल्या शेतकऱ्यांचे स्वप्न पार भंगले आहे. काही बागायतदारांनी आंबा बागायतींवर कीटकनाशके मारूनही त्यांच्या बागांची अवस्था इतर शेतकऱ्यांसारखी झाली आहे. त्यामुळे या अस्मानी संकटाचा सामना कसा करायचा या विवंचनेत चिरनेर विभागातील शेतकरी सापडला आहे.विशेष म्हणजे शेतकऱ्यांचे इतके नुकसान होत असताना कृषी विभागाचे अधिकारी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसून येत आहे.

शेतकरी शासकीय मदतीची अपेक्षा करीत असले तरी शासकीय पातळीवरून आंब्याच्या एका झाडासाठी फक्त पन्नास रुपयांची मदत येत असल्याने शेतकऱ्याची ही घोर चेष्टा असल्याने ही मदत तरी कशी घ्यावी असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे.आंबा बागायतींवर वातावरणातील बदलाचा परिणाम होऊन आंबा मोहर करपला असला तरी उरण तालुक्यात असणाऱ्या ओ एन जी सी,बी पी सी एल या रासायनिक कंपन्यांतील प्रदूषणाचा विपरीत परिणाम आंब्याच्या फळधारणेवर झाला आहे. प्रदूषित हवामानामुळे शेतकरी संकटाच्या गर्तेत सापडला आहे. असे आंबा बागायत शेतकरी अविनाश म्हात्रे यांनी सांगितले आहे.