इस्रोसाठी  परीक्षेचा दिवस; चांद्रयान आज चंद्राच्या कक्षेत पोचणार

328

पृथ्वीभोवतीची कक्षा विस्तारण्याची प्रक्रिया पार पडून चांद्रयान 2 सध्या चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. 20 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 ते 9.30 हा काळ इस्रोसाठी परीक्षेचा असेल. यावेळी चांद्रयान पृथ्वीभोवतीच्या कक्षेतून चंद्राभोवतीच्या कक्षेत जाईल. यासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी उद्याचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले आहे. चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती 65 हजार किमीपर्यंत असते. अशातच चांद्रयान 2 चा वेग कमी करावा लागेल. नाहीतर चांद्रयान चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली येऊन चंद्राला धडकू शकते. चांद्रयानाचा वेग कमी करण्यासाठी त्याची ऑनबोर्ड प्रोपल्शन सिस्टम काही काळासाठी सुरू केली जाईल. या काळात लहानशी चूकही महागात पडू शकते. त्यामुळे उद्याचा दिवस चांद्रयान 2 साठी नव्हे तर शास्त्रज्ञांची कसोटी बघणारा असेल.

चांद्रयान 2 प्राथमिकरीत्या चंद्राभोवती 118 बाय 18078 किलोमीटरच्या दीर्घवर्तुळाकार कक्षेत प्रस्थापित करण्यात येईल. त्यानंतर 2 सप्टेंबरपर्यंत चार टप्प्यांमध्ये त्याची चंद्राभोवतीची कक्षा कमी करून 100 बाय 100 किलोमीटर करण्यात येईल. 2 सप्टेंबरपर्यंत चांद्रयान 2 मधून विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हर विलग होतील.  7 सप्टेंबरला विक्रम आणि प्रग्यानला चंद्राच्या दक्षिण धुवीय प्रदेशात उतरले जाईल.

आज पहाटे 2 वाजून 21 मिनिटांनी चांद्रयानाने पृथ्वीची कक्षा सोडली. इस्रोने ट्रान्स लूनर इंजेक्शन यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. यानाचे लिक्विड इंजिन 1203 सेकंदांसाठी फायर करण्यात आले. यानंतर गेले 22 दिवस पृथ्वीच्या कक्षेत असलेले चांद्रयान-2 चंद्राच्या दिशेने झेपाकले आहे. त्याने 4.1 लाख किलोमीटरचा प्रवास केला असून उद्या ते चंद्राच्या अंतिम कक्षेत पोहोचेल. त्यानंतर 17 दिवसांनी 7 सप्टेंबरला ते चंद्रावर उतरणार आहे.

नमस्कार! मी चांद्रयान… संदेश आला

22 जुल रोजी अवकाशात झेपावलेले चांद्रयान 2 ने 25 दिवसांचा प्रवास पूर्ण केल्यानंतर एक संदेश  इस्रोला दिला आहे. चांद्रयान 2 हळूहळू चंद्राच्या कक्षेत प्रवेश करत असून 7 सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिण धुव्रावर उतरणार असल्याची माहिती या संदेशातून मिळाली आहे. ‘नमस्कार! मी चांद्रयान-2 आहे. मला देशाच्या नागरिकांना हे सांगायचे होते की आतापर्यंतचा प्रवास उत्तम झाला असून 7 सप्टेंबरला मी चंद्राच्या दक्षिण धुव्रावर उतरणार आहे. मी कुठे आहे, हे जाणून घेण्यासाठी संपर्कात रहा,’ असा संदेश यानाने पाठवला आहे. इस्रोने ट्विटच्या माध्यमातून या संदेशाची माहिती दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या