खेळाडू शोधमोहिमेसाठी स्कूल ऑलिम्पिकची गरज – रोहित पवार

क्रीडा खात्याशी माझा तसा काही संबंध नाही. मात्र, स्वतः खेळाडू असल्याने क्रीडा क्षेत्राशी माझी नाळ जोडलेली आहे. त्यामुळेच सांगतो की, महाराष्ट्रात क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी आणि प्रतिभावान खेळाडूंच्या शोधमोहिमेसाठी स्कूल ऑलिम्पिकचे आयोजन होणे गरजेचे आहे. राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार आणि क्रीडा राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्याशी याबाबत चर्चा केली आहे. ते याबाबत सकारात्मक निर्णय घेतील, अशी आशा आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली.

औद्योगिक क्रीडा स्पर्धांना संजीवनीची गरज

औद्योगिक क्रीडा स्पर्धांना अलीकडच्या काळात घरघर लागली आहे. त्यामुळे या स्पर्धांना नवसंजीवनी देण्याची गरज आहे. कारण औद्योगिक क्रीडा स्पर्धा होत असतील तरच कंपन्यांमध्ये खेळाडू कोटय़ातील जागा भरल्या जातील. शिवाय या स्पर्धेच्या माध्यमातूनही देशाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, प्रशिक्षक मिळू शकतात. जास्तीत जास्त स्पर्धा होत राहिलेल्या महाराष्ट्रात तर अधिक प्रमाणात क्रीडा संस्कृती रुजण्यास नक्कीच मदत होणार आहे, असेही रोहित पवार यांनी सांगितले.

‘साई’सारखी ‘सॅम’ची गरज

क्रीडाक्षेत्रासाठी केंद्रीय स्तरावर जसे ‘साई’ (स्पोर्टस् ऍथॉरिटी ऑफ इंडिया) सेंटर काम करते, त्याच धर्तीवर महाराष्ट्रात ‘सॅम’ (स्पोर्टस् ऍथॉरिटी ऑफ महाराष्ट्र) सेंटर सुरू करायला हवे. त्यामुळे खेळाडूंना आपल्या राज्यातही अत्याधुनिक सुविधांसह उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्यास किवा शिबीर राबविण्यास उपयोग होईल, असेही रोहित पवार म्हणाले.

क्रीडा धोरणात बदलाची प्रक्रिया सुरू

सृजन संस्थेच्या माध्यमातून मी क्रीडा क्षेत्रासाठी काम सुरू केले आहे. त्यामुळे अन्याय झालेले अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू माझ्याकडे येत असतात. याबाबतचा पाठपुरावा केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की, महाराष्ट्राच्या क्रीडा धोरणात आमूलाग्र बदल होण्याची गरज आहे. नोकरीबद्दल खेळाडूंच्या थेट नियुक्तीच्या संदर्भात अनेक चांगल्या खेळाडूंना डावलण्यात आले होते. मात्र, क्रीडामंत्री सुनील केदार यांच्या मदतीने खेळाडूंच्या थेट नियुक्तीची नवी यादी बनवायला सुरुवात झाली आहे. क्रीडा धोरणातील दुरुस्तीबाबत विविध स्तरांवरून सूचना मागविण्यात येत आहे. त्यावर सविस्तर अभ्यास करून क्रीडा धोरणात बदल करण्याचे काम क्रीडामंत्र्यांनी सुरू केले आहे, अशी माहितीही रोहित पवार यांनी दिली.

ऑलिम्पिक पदकविजेते घडविण्यासाठी

‘महाराष्ट्राच्या क्रीडाक्षेत्राची वाटचाल’ या विषयावर रोहित पवार यांनी सोमवारी पत्रकारांशी दिलखुलासपणे संवाद साधला. ते म्हणाले, ऑलिम्पिकच्या इतिहासात कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्यानंतर आजपर्यंत महाराष्ट्राच्या एकाही खेळाडूला पदक जिंकता आलेले नाही ही दुर्दैवी बाब होय. शिक्षण विभाग आणि क्रीडा विभाग यांची योग्य सांगड घालून स्कूल ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करायला हवे. या स्पर्धेच्या माध्यमातून खेडय़ापाडय़ापर्यंत प्रतिभावान खेळाडूंची शोधमोहीम राबवणे सुलभ होईल. स्कूल ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करणाऱया खेळाडूंना पैलू पाडण्याची जबाबदारी शासनाने उचलल्यास महाराष्ट्रातूनही भविष्यात अनेक ऑलिम्पिक पदकविजेते खेळाडू घडतील, असा विश्वास वाटतो.

आपली प्रतिक्रिया द्या