प्रवाशांना रांगेची शिस्त लागेना, गर्दी नियंत्रणाच्या प्रयत्नात रेल्वेचीच दमछाक; आरपीएफचा आता दंडाचा दणका, नालासोपाऱ्याच्या प्लॅटफॉर्मवर महिनाभरानंतरही निराशा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते विरार लोकलमध्ये होणाऱ्या गर्दीच्या नियोजनासाठी रेल्वे प्रशासनाने नालासोपारा स्थानकात सुरू केलेल्या रांगेच्या प्रयोगाला महिनाभरात अपेक्षित यश लाभलेले नाही. गर्दी नियंत्रणाच्या प्रयत्नात रेल्वेचीच दमछाक झाली आहे. अनेक प्रवासी सूचनांचे पालन करीत नसल्याने आता ‘आरपीएफ’ने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.

नालासोपारा स्टेशनवरील गर्दीचा विचार करीत रेल्वे प्रशासनाने गेल्या महिन्यात रांगांचा नवा प्रयोग हाती घेतला. प्लॅटफॉर्मवर प्रवाशांनी रांगा लावायच्या आणि लोकल ट्रेनमध्ये रांगेतच चढायचे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले. त्यानुसार प्लॅटफॉर्मवर विशिष्ट मार्किंगदेखील करण्यात आले. परंतु, प्रशासनाच्या आवाहनाला अनुसरून प्रवासी रांगेची शिस्त पाळत नाहीत. वारंवार आवाहन करूनही प्रवासी रांगेची शिस्त पाळत नसल्यामुळे आरपीएफने आता कठोर भूमिका घेत दंडात्मक कारवाईला सुरुवात केली आहे. जे प्रवासी प्लॅटफॉर्मवरील रांग मोडून लोकलमध्ये चढण्याची घाई करतात, त्यांना ताब्यात घेतले जाणार आहे. त्यांना रेल्वे न्यायालयापुढे हजर करून दंडात्मक कारवाई केली जात आहे.

रांग मोडणाऱ्या 15 प्रवाशांविरुद्ध गुन्हा

प्लॅटफॉर्मवरील रांग मोडून लोकलमध्ये चढणाऱ्या प्रवाशांना ताब्यात घेतले जात आहे. त्यांच्याविरुद्ध रेल्वे कायद्याच्या कलम 145 अन्वये गुन्हा नोंदवण्यात येत आहे. मागील तीन दिवसांत 15 प्रवाशांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती आरपीएफ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.