सॉसऐवजी चटणी मागितली, दुकानदाराने ग्राहकाला धू..धू…धुतले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चटणी मागितली म्हणून एका ग्राहकाला जाम चोपण्यात आले आहे. ही घटना गुजरातमधील वस्त्रपूर भागातील आहे. मारहाण करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव रवी अग्रवाल (वय 39 वर्षे) आहे. कर्णावटी दाबेली सेंटरवर तो त्याच्या मित्रासह नाश्ता करायला गेला होता. रवी हा एका खासगी बँकेमध्ये कमिशनिंग एजंट म्हणून कामाला आहे. या मारहाणीनंतर त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

रवी आणि त्याचा मित्र वस्त्रपूर तलावाजवळ असलेल्या छोट्या दुकानात खायला गेला होता. तिथे या दोघांनी दाबेली आणि वडापावची ऑर्डर दिली. खाण्याचे पदार्थ टेबलवर आल्यानंतर रवीला प्लेटमध्ये सॉस दिसला. त्याने सॉस का दिला? असा प्रश्न विचारला. यावर दुकानदाराने प्लेटसोबत सॉसच येतो असं सांगितलं. रवीने यावर त्याला चटणी द्यायला सांगितली. यावर दुकानमालक मालक संतापला आणि त्याने रवीला नीट बोल असं सांगितलं. त्याने रवीला उद्देशून म्हटलं की गेल्यावेळी त्याने जो तमाशा केला होता तो त्याने लक्षात ठेवावं.

दुकानदाराला भडकलेला पाहून रवीने त्याला आपण नीटच बोलत असल्याचं सांगितलं. यावर दुकानदाराने रवीने दारू प्यायली असल्याचा आरोप करायला सुरुवात केली. काही मिनिटांमध्ये त्याने त्याच्या दुकानातील कर्मचाऱ्यांसोबत रवीला बदडायला सुरुवात केली. असं म्हटलं जातंय की या दुकानदाराला रवी हा गोंधळ घालणारा दुसराच एक ग्राहक वाटला होता. त्याने निव्वळ संशयातून रवीला मारहाण केली.