घरांच्या किमती जाहीर न करताच सिडकोची लॉटरी; मिंधे सरकारची निवडणूक घाई

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खोके सरकारचा श्रेयवाद उफाळून आला आहे. काम पूर्ण न झालेल्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्याचा धडाका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सुरू केला आहे. नवी मुंबई विमानतळाचे काम मोठ्या प्रमाणात बाकी असतानाही फक्त स्टंटबाजी म्हणून विमान उतरवण्यात आले. त्यानंतर सिडकोच्या 26 हजार 502 घरांची लॉटरी जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे या घरांच्या किमती सिडकोने अद्याप निश्चित केलेल्या नसतानाही ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सिडकोच्या अध्यक्षांनी दहा टक्के किमती कमी करण्याची घोषणा केली होती. ही दहा टक्के सवलत 35 लाख रुपयांवर मिळणार आहे की 29 लाख रुपयांवर याबाबत नागरिकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यासाठी काही दिवसांचा कालावधी उरलेला असताना मिंधे सरकारने राज्यात अर्धवट प्रकल्पांचे उ‌द्घाटन आणि नियोजित प्रकल्पांच्या भूमिपूजनांचा सपाटा लावला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अनेक महत्त्वाच्या चाचण्या बाकी असतानाच काल शुक्रवारी हवाई दलाचे विमान उतरवण्यात आले. धावपट्टीची चाचणी घेण्यात आल्याचा गाजावाजा मिंधे सरकारने केला असला तरी ही कोणतीही चाचणी नव्हती. फक्त विमान उतरवण्यात आले असल्याचे सिडकोच्या आणि अदानी समूहाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सरकारची स्टंटबाजी चव्हाट्यावर आली आहे. त्याच पाठोपाठ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सिडकोची 26 हजार 502 घरांची योजना जाहीर करण्यात आली. मात्र ही योजना जाहीर करताना घरांच्या किमती सिडकोने निश्चित केलेल्या नाहीत. या किमती अर्जदारांना नंतर कळवण्यात येणार असल्याचे सिडकोने सांगितले आहे. घरांच्या किमतीच निश्चित नसल्यामुळे अर्जदारांचा संभ्रम वाढला आहे.

अर्ज भरायचा की नाही?
म्हाडाचे कोकण मंडळ आणि पुणे मंडळानेही गृहनिर्माण योजना जाहीर केल्या आहेत. सिडकोच्या तुलनेत म्हाडाची पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे, ठाणे यांच्यासह अन्य शहरातील घरे आकाराने मोठी आहेत. तसेच त्यांच्या किमतीही कमी आहेत. त्यामुळे अर्ज नेमका कोणता भरायचा असा प्रश्न अर्जदारांना पडला आहे. सिडकोने जर आपल्या घरांच्या किमती निश्चित केल्या असत्या तर अर्जदारांना तयारी करता आली असती. मात्र घरांच्या किमतीचा उल्लेख न करताच लॉटरी जाहीर केल्यामुळे अर्जदारांमध्ये नाराजी वाढली आहे.