दोन हजार भाग्यवंतांना सिडकोच्या घरांवर सोडावे लागणार पाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिडकोने 15 हजार घरांसाठी काढलेल्या सोडतीमधील दोन हजार भाग्यवंतांवर आपले घर गमवण्याची वेळ आली आहे. या लॉटरीत यशस्वी झालेल्या अर्जदारांना तीन टप्प्यांतील रक्कम भरण्यासाठी 180 दिवसांची मुदत दिली होती. मात्र बँकांनी गृहकर्जाची प्रक्रिया किचकट बनवल्यामुळे शेकडो यशस्वी अर्जदारांना दिलेल्या मुदतीत पैसे भरता आले नाहीत. मुदत संपल्यामुळे पैसे स्वीकारणारी ऑनलाइन यंत्रणा बंद झाली असून हादरलेल्या भाग्यवंतांच्या सिडकोच्या पणन विभागात येरझाऱ्या सुरू झाल्या आहेत. अनेकांनी पहिला आणि दुसरा हप्ता भरलेला असतानाही त्यांचे घर रद्द होणार असल्याने ते प्रचंड तणावाखाली आले आहेत.

सिडकोने काढलेल्या 15 हजार घरांच्या सोडतीनंतर सर्व यशस्वी अर्जदारांची पात्रता तपासली आणि त्यानंतर पात्र ठरलेल्या अर्जदारांना सप्टेंबर 2019 मध्ये अॅलोटमेन्ट लेटर पाठवले. त्यानुसार बहुतेक अर्जदारांना पहिला हप्ता ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत भरायचा होता. दुसरा हप्ता डिसेंबर 2019 आणि तिसरा हप्ता जानेवारी 2020 मध्ये भरणे अपेक्षित होते. मात्र हे हप्ते भरताना अनेक अर्जदारांना अडचणी आल्या. काही अर्जदारांनी पहिलाही हप्ता भरला नाही. त्यामुळे सिडको प्रशासनाने नियमित हप्ते न भरणाऱ्या अर्जदारांसाठी 180 दिवसांची अंतिम मुदत दिली. ही मुदत शनिवारी 8 फेब्रुवारी रोजी संपली आहे. या शेवटच्या दिवसांत अनेक अर्जदारांनी पैसे उसणवारीने घेऊन तिन्ही हप्ते भरण्याचा प्रयत्न केला. मात्र एकदम ताण पडल्यामुळे पैसे स्वीकारणारी ऑनलाइन यंत्रणा कोलमडली.

एमडींना साकडे.. आमच्या हक्काचा निवारा वाचवा..
पैसे भरण्याची मुदत संपल्यानंतर जवळपास 100 अर्जदारांनी आम्ही पैसे भरण्यास तयार आहोत, आमचे घर रद्द करू नये, आमचे पैसे स्वीकारण्यात यावेत, अशी विनंती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांना केली आहे. आजही अनेक अर्जदारांनी ऑनलाइन अर्जांबरोबर थेट व्यवस्थापकीय संचालकांकडेही आमचे घरे वाचवा, अशी विनंती केली.

  • पहिला आणि दुसरा हप्ता भरल्यानंतरही घरांचे वाटप रद्द झाले तर अर्जदारांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. त्यांनी लॉटरीमध्ये सहभागी होण्यासाठी सुरुवातीला भरलेली अनामत रक्कम जप्त होणार असून भरणा केलेल्या रकमेमधून दहा टक्के कपात केली जाणार आहे. जीएसटीची रक्कमही परत मिळणार नाही.
  • बहुतेक अर्जदारांनी पहिला हप्ता स्वत: भरला असून उरलेल्या हप्त्यांसाठी बँकांकडून कर्ज घेतले आहे. बँकांच्या अटी अलीकडे फार किचकट झाल्या आहेत. त्यामुळे हप्त्यांसाठी तारीख पे तारीख पडत असल्याने विलंब होत असल्याची प्रतिक्रिया अर्जदारांनी व्यक्त केली आहे.