
मनोज सातवी, वसई
मुसळधार पावसाने वसई-विरारकरांचे जनजीवन विस्कळीत झालं असून समस्या संपता संपत नाहीत. विरार, नालासोपारा, वसई इत्यादी ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला असून पाणीपुरवठाही ठप्प झाला आहे.
वसईतील महावितरणच्या सबस्टेशनमध्ये पाणी शिरल्यामुळे मंगळवारी सकाळी ६.३० पासून वसई, नालासोपारा, विरारमध्ये वीज पुरवठा बंद झाला आहे. वीज नसल्यामुळे पाणीपुरवठाही झालेला नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. तसंच पावसामुळे मोबाईल टॉवरमध्ये बिघाड झाल्याने मोबाईल-इंटरनेटही ठप्प झालं आहे. विरार ते वसई रेल्वेसेवाही विस्कळीत झाल्याने तंत्रज्ञही विरारमध्ये पोहोचू शकलेले नाहीत. त्यामुळे नागरिक चौफेर कोंडीत सापडले आहेत.
वसई नालासोपारा अजुनही तुंबलेलेच
वसई रोड आणि वसई फाटा हायवेला जोडणारा मार्ग आजही पाण्याखालीच आहे, त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय. गोखिवरे येथे या मार्गावर काही ठिकाणी एक ते दीड फूट तर काही ठिकाणी दोन ते अडीच फूट पाणी भरल्याने शहर बस तसेच एसटी बस सेवा आणि ऑटोरिक्षाही बंद आहेत.


























































