
एनसीईआरटीच्या (NCERT) इयत्ता ८ वीच्या नवीन पुस्तकात ‘Corruption In Judiciary’ (न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचार) या विषयावर समाविष्ट करण्यात आलेल्या धड्यावर हिंदुस्थानचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बुधवारी तीव्र आक्षेप घेतला आहे. संस्थेची बदनामी किंवा मानहानी करण्याचा प्रयत्न कोणालाही करू दिला जाणार नाही आणि याप्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा सरन्यायाधीशांनी दिला आहे.
एनसीईआरटीच्या इयत्ता ८ वीच्या सामाजिक शास्त्राच्या नवीन पुस्तकात एका धड्यात ‘न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचार’ आणि ‘प्रलंबित खटल्यांचे डोंगर’ ही न्यायव्यवस्थेसमोरील मोठी आव्हाने असल्याचे नमूद करण्यात आले होते. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर कायदेशीर वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि डॉ. अभिषेक मनु सिंघवी यांनी हा विषय सरन्यायाधीशांच्या निदर्शनास आणून दिला. ‘न्यायव्यवस्थेचे घटक म्हणून आम्हाला या गोष्टीमुळे प्रचंड त्रास झाला आहे की, इयत्ता ८ वीच्या मुलांना न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचाराबद्दल शिकवले जात आहे. हा प्रकार अत्यंत अपमानास्पद आणि धक्कादायक आहे’, असे सिब्बल यांनी कोर्टात सांगितले.
यावर सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले की, ‘मी या प्रकरणाबाबत पूर्णपणे जागरूक आहे. मला या संदर्भात अनेक फोन आणि संदेश आले आहेत. अनेक न्यायाधीश या मजकुरामुळे व्यथित झाले आहेत. मी तुम्हाला खात्री देतो, मी आधीच आदेश दिले असून या प्रकरणाची ‘सुओ मोटो’ (स्वतःहून) दखल घेत आहे’.
ते पुढे म्हणाले की, ‘या संस्थेच्या अखंडतेला धक्का लावण्याची आणि तिची बदनामी करण्याची परवानगी मी कोणालाही देणार नाही. कोणत्याही परिस्थितीत मी हे खपवून घेणार नाही. ती व्यक्ती कितीही मोठी असली तरी कायदा आपले काम करेल. या परिस्थितीशी कसे लढायचे हे मला चांगले ठाऊक आहे’.
निवडक टीकेवर सिंघवींचा प्रश्न
अभिषेक मनु सिंघवी यांनी या मजकुराच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केला. केवळ न्यायव्यवस्थेलाच लक्ष्य का केले गेले? नोकरशाही, राजकारण आणि सार्वजनिक जीवनातील भ्रष्टाचाराबद्दल पुस्तकात एक शब्दही नाही, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. यावर सरन्यायाधीशांनीही सहमती दर्शवत हा एक ‘खूप विचार करून आणि खूप खोलवर रचलेला कट’ असल्याचे भाष्य केले. न्यायमूर्ती बागची यांनीदेखील या पुस्तकाच्या रचनेत ‘घटनात्मक अखंडता’ गहाळ असल्याचे मत व्यक्त केले.
cji surya kant takes suo motu notice ncert class 8 book corruption in judiciary saamana news
CJI Surya Kant objects to NCERT Class 8 textbook chapter on corruption in judiciary. Supreme Court takes suo motu notice. Read details on Saamana.com.





























































