जालना पोलीस अधिक्षक कार्यालयातील लाचखोर लिपीकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जालना

जालना पोलीस अधीक्षक कार्यालयातील वेलफेअरचा कनिष्ठ लिपीक नागसेन ज्ञानोबा पवार याला एका पोलिसाकडूनच तीन हजाराची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात करण्यात आली. जालना येथील तक्रारदार पोलिस कर्मचारी आहेत. त्यांच्या आईच्या शस्त्रक्रियेसाठी पैशांची गरज असल्याने त्यांनी पोलीस कल्याण निधीच्या कर्जासाठी पोलीस अधीक्षक जालना यांच्याकडे अर्ज दिला होता.

हा अर्ज साहेबांसमोर ठेवण्याचे काम लिपीक पवार यांच्याकडे होते. अर्ज साहेबांसमोर ठेऊन मंजूर करून देण्यासाठी पवार यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली. तक्रारदार पोलिस कर्मचाऱ्याची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. तक्रारीनुसार पोलीस अधीक्षक कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी लाचेच्या मागणीची पडताळणी केली. त्यानंतर पवार यांना एका पोलीस कर्मचाऱ्याकडून तीन हजाराची लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले. पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी, अप्पर पोलीस अधीक्षक जिरगे, पोलीस उपअधीक्षक रविंद्र डी. निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक काशीद, विनोद चव्हाण, कर्मचारी संतोष धायडे, प्रदीप दौंडे, संजय उद्गीरकर, गंभीर पाटील, रामचंद्र कुदर, महेंद्र सोनवणे, ज्ञानेश्वर म्हस्के, संदीप लव्हारे, रमेश चव्हाण, प्रविण खंदारे यांनी ही कामगिरी पार पाडली.