
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) रावण दहनाच्या कार्यक्रमात मोठा राडा झाला आहे. उमर खालिद, शरजील इमाम यांना रावणाच्या रूपात दाखविल्यानंतर जेएनयूमध्ये संघर्ष सुरू झाला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात रावणाच्या प्रतीकात्मक पुतळ्यात जेएनयूचे माजी विद्यार्थी उमर खालिद आणि शरजील इमाम या दोघांना रावणाच्या रूपात दाखवण्यात आले होते. त्या दोघांवर सीएएविरोधी निदर्शने आणि दिल्ली दंगलीतील कट रचल्याचा आरोप आहे.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) दुर्गा मूर्ती विसर्जन मिरवणुकीवर डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी गटांनी हल्ला केल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (एबीव्हीपी) गुरुवारी केला, तर डाव्या संघटनांनी एबीव्हीपीवर रावण दहन कार्यक्रमाद्वारे राजकीय प्रचारासाठी धर्माचा वापर केल्याचा आरोप केला. या संघर्षाबाबत जेएनयू प्रशासनाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
दसरा विसर्जन शोभा यात्रेदरम्यान जेएनयू कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये संघर्ष झाला. एबीव्हीपीने सांगितले की, एआयएसए, एसएफआय आणि डीएसएफसह डाव्या गटांनी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास साबरमती टी-पॉइंटजवळ विसर्जन मिरवणुकीवर हल्ला केला. त्यांनी केलेल्या दगडफेकीत अनेक विद्यार्थी, विदार्थिनी जखमी झाल्या आहेत.
डाव्या पक्षाशी संलग्न असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेने (एआयएसए) हे आरोप फेटाळून लावले आणि त्याऐवजी एबीव्हीपीवर राजकीय प्रचारासाठी धर्माचा वापर केल्याचा आरोप केला. एआयएसएने एका निवेदनात म्हटले आहे की एबीव्हीपी रावण दहन आयोजित करत आहे. त्यात जेएनयूचे माजी विद्यार्थी उमर खालिद आणि शरजील इमाम यांना रावण म्हणून दाखवले आहे. हे इस्लामोफोबियाचे स्पष्ट आणि घृणास्पद दर्शन आहे. राजकीय लाभ मिळविण्यासाठी धार्मिक भावनांचा गैरवापर करत आहे, असे एआयएसएने म्हटले आहे.