सोमय्या पुन्हा आपटले! हरित लवादाची साई रिसॉर्टला क्लीन चिट!

हरित लवादाच्या न्यायाधीशांनी या प्रकरणात काहीच तथ्य नसल्याचे निरीक्षण नोंदवल्याचे समजताच अब्रू जाईल या भीतीने सोमय्यांनी याचिका मागे घेतली. आता उच्च न्यायालयातही ते तोंडघशी पडतील.

भाजपा नेते किरीट सोमय्या आज पुन्हा एकदा तोंडावर आपटले. रत्नागिरीतील दापोली येथील समुद्र किनाऱ्यावरील साई रिसॉर्ट प्रकरणी सोमय्यांनी दाखल केलेली याचिका आज हरित लवादाने फेटाळून लावली. हे रिसॉर्ट बेकायदा असून त्यामुळे पर्यावरणाला धोका असल्याने ते पाडण्यात यावे, अशी मागणी सोमय्यांनी या याचिकेत केली होती. परंतु या प्रकरणात काहीच तथ्य नसल्याचे निरीक्षण लवादाने नोंदवले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अॅड. अनिल परब यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती देताना सोमय्यांवर जोरदार निशाणा साधला. साई रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात जाते, असा सोमय्यांचा आरोप होता. पण जो रिसॉर्ट सुरूच झालेला नाही त्याचे सांडपाणी समुद्रात कसे जाऊ शकते, असा सवाल आमदार परब यांनी उपस्थित केला.

अनिल परब म्हणाले की, साई रिसॉर्टमधून कोणतेही सांडपाणी जात नाही, असा अहवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, दिल्लीतील प्रदूषण मंडळाने, ईडीने दिला आहे. त्यामुळे हा गुन्हा सत्र न्यायालयाने रद्दबादल केला आहे. सोमय्यांनी एक प्रकारे शासनाची फसवणूक केली आहे. हे गुन्हे रद्द झाल्यावर त्यांनी आणखी दोन गुन्हे रंगवले. ते गुन्हे रद्द करण्याकरिता मी उच्च न्यायालयात अर्ज केले आहेत. खोटे गुन्हे आम्ही सिद्ध करू. प्रत्येक ठिकाणाहून त्यांना याचिका मागे घ्याव्या लागत आहेत. मुख्य गुह्याच्या आधारे ईडीने चौकशी सुरू केली होती. मात्र गुन्हाच मागे घेतल्यावर दुसरा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला की, अर्ध्या इमारतीची परवानगी असताना पूर्ण इमारत बांधली गेली. महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी हे आरोप केले गेले, असे आमदार परब म्हणाले.

उच्च न्यायालयातही तोंडघशी पडतील

‘‘हरित लवादाच्या न्यायाधीशांनी या प्रकरणात काहीच तथ्य नसल्याचे निरीक्षण नोंदवल्याचे समजताच अब्रू जाईल या भीतीने सोमय्यांनी याचिका मागे घेतली. आता उच्च न्यायालयातही ते तोंडघशी पडतील. त्यांना आपली याचिका मागे घ्यावी लागेल किंवा न्यायालयच हे प्रकरण रद्दबातल करेल,’’ असे परब म्हणाले. सदानंद कदम यांनाही खोटय़ा गुह्यात अडकवले आहे. खेडची सभा झाल्यावर लगेच त्यांना अटक केली गेली. न्यायालयात  त्यांना न्याय मिळेल, असेही परब म्हणाले.

किती मिंधे भाजपकडून लढतील ते दिसेल

  शिंदे गट लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडे 22 जागांची मागणी करणार असल्याचे माध्यमांनी विचारले असता अनिल परब म्हणाले की, शिंदे गटात जागांबाबत कोणी आवाज चढवला तर त्यांच्या नाडय़ा दाबल्या जातील. कारण अपात्रतेची कारवाई भाजपच्या हातात आहे. निवडणुका लागू द्या, मग कळेल की किती जण शिंदेंकडून लढतायत आणि भाजपकडून.

सोमय्यांना नाक घासून माफी मागावी लागेल

खोटेनाटे आरोप करून किरीट सोमय्यांनी माझी नाहक बदनामी केली आहे. पण न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल आणि किरीट सोमय्यांना एक दिवस नाक घासून आमची माफी मागावी लागेल, असा इशाराही आमदार परब यांनी दिला. सोमय्यांविरोधात आम्ही 100 कोटींचा मानहानीचा दावाही दाखल केला असून सोमय्यांना माफी मागावी लागेल किंवा 100 कोटी द्यावे लागतील, असेही ते म्हणाले.