
सोशल मीडियावर लाईक्स मिळवण्याच्या इच्छेतून एखाद्या चांगल्या कामाची प्रेरणा मिळू शकते. मध्य प्रदेशमधील बियाओरा येथील 20 वर्षांचा बित्तू तबाही याने हे दाखवून दिले. बित्तूने व्हिडीओ बनवण्याच्या निमित्ताने एक प्रदूषित नदी स्वच्छ करण्याचा उपक्रम हाती घेतला. सुरुवातीला लोकांनी त्याच्यावर खूप टीका केली. व्हिडीओ व्हायरल करण्यासाठी तो स्वच्छतेचं नाटक करतोय, प्रसिद्ध होण्यासाठी नको ते करतोय, अशा कमेंट करून लोकांनी त्याला ट्रोल केले. ट्रोलिंगला वैतागून मित्रही त्याची साथ सोडून निघून गेले. पण हा मुलगा काही थांबला नाही. उलट तो आणखी जिद्दीने नदीमधील प्लॅस्टिक, शेवाळ आणि कचरा काढत राहिला. त्याने एकटय़ाने नदी बऱ्याच प्रमाणात स्वच्छ केली. त्याच्या कामाचे आता नेटकरी कौतुक करत आहेत.



























































