
जम्मू-कश्मीरमधील अमरनाथच्या पवित्र गुंफेजवळ शुक्रवारी सायंकाळी भीषण ढगफुटी झाली. यात 3 महिलांसह 15 भाविक ठार झाले, तर 40 हून अधिक जखमी झाले असून अनेकजण बेपत्ता आहेत. ढगफुटीमुळे परिसरात पाण्याचे मोठे लोट तयार झाल्याने त्यात भाविकांचे 25 हून अधिक तंबू वाहून गेले. तसेच सामुदायिक किचनचे प्रचंड नुकसान झाले. या घटनेमुळे अमरनाथ यात्रेला देशभरातून आलेल्या हजारो भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अमरनाथ गुंफेजवळील बेस कॅम्पला ढगफुटीचा मोठा तडाखा बसला. शुक्रवारी सायंकाळी 5.30च्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात प्रचंड हाहाकार उडाला. अतिवृष्टी आणि त्यात झालेली ढगफुटी यामुळे गुंफेजवळचा संपूर्ण परिसर पाण्याच्या लोटने व्यापून गेला. दुर्घटनेत अमरनाथ यात्रामार्गावरील सामुदायिक किचन आणि अनेक तंबूंचे प्रचंड नुकसान झाले आहे. पाण्याच्या लोटात 25 हून अधिक तंबू वाहून गेले. यात 3 महिलांसह 15 जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेतील जखमींना वाचवण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य हाती घेण्यात आले. जखमींना एअरलिफ्ट करून उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांमार्फत रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. अनेकजण बेपत्ता असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेनंतर अमरनाथ यात्रा अनिश्चित कालावधीसाठी थांबवण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदींनी घेतला परिस्थितीचा आढावा
ढगफुटीच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-कश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. दुर्घटनास्थळी एसडीआरएफ, एनडीआरएफच्या पथकांमार्फत युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. जखमींना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिले.




























































