शालेय शिक्षणातही क्लस्टर योजना; कमी पटसंख्येच्या शाळांसाठी पानशेत पॅटर्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मेघा गवंडे-किटे

शालेय शिक्षणातही क्लस्टर योजना राबविण्यात येणार आहे. या क्लस्टर योजनेचा प्रस्ताव तयार असून पानशेत पॅटर्नच्या धर्तीवर हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. वेल्हे तालुक्यातील पानशेत येथे उभारण्यात आलेल्या क्लस्टर शाळेमध्ये परिसरातील कमी पटसंख्येच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना सामावून घेण्यात आले आहे. याच धर्तीवर राज्यातील 0 ते 10 पटसंख्येच्या शाळांसाठी क्लस्टर योजना म्हणजेच समूह शाळा योजना येत्या काळात सुरू होऊ शकते.

राज्यातील 0 ते 10 पटसंख्येच्या एकूण 7 हजार 481 शाळा असून 293 शाळांची विद्यार्थी संख्या शून्य आहे. या शाळांसाठी क्लस्टर योजना राबविण्याचा प्रस्ताव असून शालेय शिक्षण विभागाकडे तो पाठविण्यात आला आहे. या शाळांसाठी राज्य सरकारच निर्णय जाहीर करेल, अशी माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली.

छोटय़ा शाळांसाठी मृत्युघंटा

पानशेत पॅटर्न हा छोटय़ा शाळांसाठी मृत्युघंटा आहे, असे वाटते. एक ते तीन किलोमीटर परिसरातील अनेक शाळा बंद करून 10-15 किलोमीटर अंतरावर एकच शाळा बांधणे म्हणजे शिक्षण हक्क कायदा आणि राष्ट्रीय शिक्षण धोरणातील तरतुदीनुसार विसंगत आहे. ही शाळा संकुल योजना म्हणजे कोठारी आयोगाने सुचवलेली शाळा समूह योजनाच आहे. यामुळे कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार नाहीत याबाबत ठोस उत्तर मिळायला हवे.

– महेंद्र गणपुले, राज्य प्रवक्ता,  (राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ)

सर्वाधिक फटका मराठी शाळांना

राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये सर्वाधिक शाळा मराठी माध्यमाच्या आहेत. विद्यार्थी संख्या कमी होण्यास सरकारच जबाबदार आहे. या शाळांच्या परिसरात नवीन इंग्रजी शाळांना परवानगी दिली. मराठी शाळांमध्ये शिक्षकच नसल्यामुळे गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला. तसेच पालकांची मानसिकताही याला जबाबदार असून इंग्रजीतून शिक्षणाकडे त्यांचा कल आहे. याउलट राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणावर भर दिला आहे.

–  सुशील शेजुळे, समन्वयक, (मराठी शाळा संस्थाचालक संघ)

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020 स्कूल कॉम्प्लेक्स योजना दिली असून यात एका परिसरातील शाळांमध्ये ज्या भौतिक सुविधा उत्तम आहेत त्याचा वापर इतर शाळांमधील विद्यार्थ्यांना करता आला पाहिजे, असे नमूद आहे. उदाहरणार्थ एखाद्या शाळेत उत्तम कॉम्प्युटर लॅब असेल तर नजीकच्या कॉम्प्युटर लॅब नसलेल्या शाळेतील विद्यार्थी त्या शाळेत येऊन संगणकाचे शिक्षण घेऊ शकतात. खेळाचे मैदान नसलेल्या शाळेतील विद्यार्थी मैदान असलेल्या शाळेत जाऊन खेळाचा सराव करू शकतात.

असा आहे पानशेत पॅटर्न

वेल्हे तालुक्यातील पानशेत या धरणग्रस्त गावात शाळा समूह योजना सुरू केली आहे.

20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याऐवजी या शाळांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे.

यानुसार 16 शाळांतील सर्व विद्यार्थ्यांसाठी एकच शाळा उभारली आहे.

पुणे जिल्हा परिषदेची ही योजना आहे.

राज्यातील शाळांची स्थिती

एकूण शाळा 1 लाख 8 हजार 787

0 ते 10 पटसंख्येच्या शाळा 7 हजार 481

पटसंख्या       शाळा

  • 0      293
  • 1      593
  • 2       514
  • 3       616
  • 4       621
  • 5       749  
  • 6       767
  • 7      708
  • 8       789
  • 9        801

10      1030