काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा सुपडा साफ करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
cm-devendra-fadnavis

सामना प्रतिनिधी । नांदेड

गरीबी हटाव चां नारा देऊन गेल्या अनेक वर्षांपासून जनतेला फसवणाऱ्या काँग्रेसला या निवडणुकीत धडा शिकवा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलुर येथील जाहीर सभेत ते बोलत होते. विदर्भातील सर्वच्या सर्व जागा सेना-भाजप युती जिंकेल आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा सुपडा साफ होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.

आपल्या भाषणात फडणवीस यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. ‘निवडणूक आली की यांना गरिबी हटावचा कार्यक्रम आठवतो आणि निवडणुका झाल्यात ते सर्वजण विसरुन जातात. पंडित नेहरू यांच्यापासून ते सोनिया गांधी यांच्यापर्यंत सर्वांनी आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीमध्ये गरिबी हटावचा नारा दिला परंतू गरीबी तशीच कायम आहे . नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेसने गेल्या पंधरा वर्षांमध्ये केवळ साडेतीनशे कोटी रुपयांचा विकासनिधी दिला परंतु युती सरकारने गेल्या पाच वर्षांमध्ये 2226 कोटींचा विकास निधी दिला आहे. आमचे शासन सत्तेवर आले तर यापुढे शेतकऱ्यांसाठी विविध विकास योजना राबवण्यात येतील त्यामध्ये शेतकरी निवृत्ती वेतन देणारे हे जगातले पहिले सरकार असेल. त्याचबरोबर शेतकऱ्यांना एक लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळेल आणि या कर्जावर पाच वर्षापर्यंत कोणतेही व्याज लागणार नाही. यापूर्वी नांदेडमध्ये कुठलाही राष्ट्रीय महामार्ग नव्हता परंतु सरकार सत्तेवर आल्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाची अठरा हजार कोटीची कामे सुरू असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले

यावेळी उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार सुभाष साबणे, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी मंत्री सूर्यकाता पाटील, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर आदींची भाषणे झाली..सूत्रसंचालन गंगाधर जोशी यांनी केले..