निवडणूकांवर डोळा ठेवून भाजपाचे ‘गणेश दर्शन’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

आगामी निवडणुकांच्या दृष्टीने भाजपाने जोरदार फिल्डिंग लावली आहे. संपर्क अभियानाच्या निमित्ताने पक्षाध्यक्ष अमित शाह स्वत: विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या भेटी घेऊन पाठिंबा मिळवत आहेत. शाह यांच्या पावलावर पाऊल टाकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही समर्थन मिळवण्यासाठी गणेश दर्शन अभियान सुरू केल्याचे उघड झाले आहे. उत्सवी माहोल असल्याचे निमित्त पुढे करून मुख्यमंत्र्यांनी जणू काही विरोधी पक्षातील नाराजांना गळाला लावण्याचेच प्रयत्न सुरू केले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराज नेते जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे बंधू भारतभूषण क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले, तर मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस नेते आणि माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांच्या निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. भाजपा अध्यक्ष अमित शाह, फडणवीस आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावरून मुख्यमंत्र्यांनी गणेशोत्सवाच्या काळातच समर्थनासाठी गणेश दर्शन अभियान सुरू केल्याचे समोर आले आहे.

म्हणून कृपाशंकर यांच्यावर नजर
बेहिशोबी मालमत्ता प्रकरणामुळे अडचणीत आल्यामुळे सध्या राजकारणापासून चार हात लांबच असलेल्या कृपाशंकर सिंह यांना भाजपात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच मुख्यमंत्र्यांनी कृपाशंकर सिंह यांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतल्याने पुन्हा एकदा याचीच चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, कृपाशंकर सिंह यांनी मात्र आपण अद्याप काँग्रेसचेच सदस्य असल्याचे सांगितले असून भविष्याचे आताच काही सांगता येणार नाही, असे म्हटल्याने त्यांच्याबद्दल सुरू असलेल्या चर्चेला आणखी बळ दिले आहे.

बीडमध्ये राष्ट्रवादीला झटका
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या घरी जाऊन पाहुणचार घेतला होता. तर क्षीरसागर यांनी ग्रामविकास मंत्री आणि बीडच्या पालक मंत्री पंकजा मुंडे यांच्या रॉयल स्टोन शासकीय निवासस्थानी जाऊन मुंडे यांची भेट घेतली होती. राष्ट्रवादीतून भाजपात येऊन विधान परिषदेत गेलेले आमदार सुरेश धस या वेळी त्यांच्यासोबत होते. त्यानंतर आज क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. त्यामुळे बीडमध्ये राष्ट्रवादीला मोठा झटका बसल्याची चर्चाच सध्या सर्वत्र सुरू आहे.