रायगड किल्ल्याला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
devendra-fadnavis

सामना प्रतिनिधी । अलिबाग

हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर डागडुजीचे काम सध्या जोरात सुरू असून किल्ल्याला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. रायगड विकास प्राधिकरण अंतर्गत पुरातत्व विभागाच्या वतीने सध्या किल्ल्यावर दुरुस्तीची कामे करण्यात येत असून या संपूर्ण प्रकल्पासाठी 600 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. जुन्या पायऱया, तळी, बाजारपेठ, मंदिरे या वास्तूंचादेखील कायापालट केला जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अचानकपणे किल्ल्यावर जाऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. हत्ती खाना, हत्ती तलाव आदी वास्तूंचे उत्खनन करण्यात आले असून त्याचीही पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळावर जाऊन अभिवादन केले. मुख्यमंत्र्यांनी खासदार युवराज छत्रपती संभाजी राजे, भरत गोगावले, आमदार प्रवीण दरेकर, अनिकेत तटकरे, रघुजीराजे आंग्रे यांच्याशी किल्ल्याच्या संवर्धनाबाबत चर्चा केली. पुरातत्व विभागामार्फत 300 वाडय़ांचा शोध लागला असून त्यापैकी दोन वाडय़ांचे कामदेखील सुरू करण्यात आले आहे. प्राधिकरणाच्या माध्यमातून किल्ल्याच्या मूळ पायऱयाचे कामदेखील पूर्ण झाले आहे. प्राधिकरणाने 50 एकर जमीन अधिग्रहित केली आहे.

तोच खडक… तीच चुनखडी

रायगडावरील रस्ते तसेच पाणी याकडे विशेष लक्ष दिले जाणार असून रायरेश्वर मंदिराकडील पायवाटेचे कामदेखील सुरू आहे. हत्तीचा माळरान, हत्ती तलाव याचीही दुरुस्ती होणार आहे. मूळ किल्ल्याचे बांधकाम करताना ज्या खडकाचा वापर करण्यात आला होता तोच खडक व तीच चुनखडी बांधकामांसाठी वापरली जाणार आहे. या प्रकल्पासाठी सरकारने 600 कोटींचा विकास आराखडा तयार केला आहे.