भाजप इलेक्शन मोडवर, पुणे एक्सप्रेस वेची मिसिंग लिंक ऑक्टोबरमध्ये पूर्ण करण्याची धडपड

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागात मिसिंग लिंक प्रकल्प उभारण्यात येत आहे. हे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार होते, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आदेश संबंधितांना दिले.

मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी केली. मिसिंग लिंकमुळे दोन महत्त्वाचे फायदे होणार आहेत. यामध्ये पहिले म्हणजे 6 किमीचे अंतर कमी होणार आहे, तर दुसरे म्हणजे मुंबई-पुणे प्रवासासाठी अर्धा तास कमी लागणार आहे. मुंबई-पुणे इकोनॉमी कॉरिडॉर तयार व्हावा अशी सर्वांची अपेक्षा होती तो आता तयार होतोय. मिसिंग लिंक हा त्याचाच एक भाग आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मिसिंग लिंक जगातला सगळय़ात रुंद बोगदा आहे. हा मार्ग लोणावळा लेकच्या खाली हजार फूट असणार आहे. जगातला सर्वात अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून हा मिसिंग लिंक तयार केला आहे. हा प्रकल्प 2019 मध्ये सुरू करण्यात आला असून अनेकदा त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता डिसेंबरची डेडलाइन कमी करून ऑक्टोबर 2025 पर्यंत मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

कसा आहे मिसिंग लिंक प्रकल्प…

मिसिंग प्रकल्पामध्ये खोपोली एक्झिटपासून लोणावळ्यापर्यंत 4 मार्गिकांसाठीचे दोन बोगदे उभारण्यात आले आहेत. पहिला बोगदा 8.92 किमी, तर दुसरा बोगदा 1.75 किमीचा आहे, तर या बोगद्याला जोडणारा आणि टागर व्हॅलीवर बांधला जाणारा केबल-स्टेड पूल जमिनीपासून सुमारे 132 फूट उंचीवर असून 640 मीटर लांब आहे.