
महापालिका निवडणुकीसाठी भाजप मिशन इलेक्शन मोडवर आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबई विमानतळाच्या साईटची पाहणी केली. या साईटवर दररोज सुमारे 13 हजार कामगार काम करीत आहेत. त्यांची संख्या दुपटीने वाढवा, पण विमानतळाचे काम येत्या 30 सप्टेंबरच्या आत पूर्ण करा, अशी तंबी मुख्यमंत्र्यांनी अदानी समूह, विमानतळ प्राधिकरण आणि सिडकोला दिली.
नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाच्या आतापर्यंत सुमारे अर्धा डझन डेडलाइन हुकल्या आहेत. मध्यंतरी अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांनी जून महिन्यात विमानतळाचे उद्घाटन होईल अशी घोषणा केली होती, तीही हवेत विरली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आमदारांच्या एका समितीने विमानतळाच्या साईटची पाहणी केली आणि कामाचा आढावा घेतला. त्यावेळी हे काम येत्या सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल असे अदानी समूहाने स्पष्ट केले होते.
सर्व टर्मिनल टेनने जोडणार
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे इतर विमानतळांपेक्षा वेगळे असणार आहे. या विमानतळाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवाशांनी प्रवेश केल्यानंतर त्यांना पाहिजे त्या टर्मिनलमध्ये टेनने जाता येणार आहे. या दुसऱया टप्प्यात सर्वच टर्मिनल भुयारी मार्गाद्वारे टेनने जोडले जाणार आहेत. त्यानंतर ट्रव्हलरचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे विमानतळावर प्रवाशांना पायपीट करावी लागणार नाही असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
ग्रीन एअरपोर्ट
नवी मुंबई विमानतळ हे ग्रीन एअरपोर्ट म्हणून ओळखले जाणार आहे. या विमानतळावर सुमारे 37 मेगावॅट हरित ऊर्जेचा वापर केला जाणार आहे. विमानतळाच्या अंतर्गत धावणारी 50 टक्के वाहने ही इलेक्ट्रीक असणार आहेत. या विमानतळावरील बॅगेजचा बारकोड 360 डिग्रीमध्ये वाचता येणार आहे. बॅगेजची सुविधा जगात सर्वाधिक जलद राहणार आहे असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
उद्घाटनासाठी मोदींची वेळ घ्यायचीय
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळाची पाहणी करून रन वे, टर्मिनल आणि सुविधांची पाहणी केली. विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ घ्यायची आहे, त्यामुळे सर्व काम येत्या 30 सप्टेंबरच्या आत उरका, अशा सूचना त्यांनी अदानी समूह, विमानतळ प्राधिकरण आणि सिडकोला दिल्या.