गतिमान कार्यवाही, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 106 जणांना 35 लाखांची मदत

3228

मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे काम अतिशय गतिमान रीतीने सुरू असून 25 नोव्हेंबर, 2019 पासून 106 प्रकरणांत 35 लाख 8 हजार 500 रुपयांची मदत रुग्णांना देण्यात आली. त्याचप्रमाणे या योजनेसह रुग्णांना अन्य योजनांद्वारेही एकूण 495 प्रकरणांत मदत करण्यात आली आहे. मदतनिधीकडे प्राप्त होणाऱया अर्जांवर तातडीने कार्यवाही करून ते निकाली काढण्यात येत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वैद्यकीय सहाय्यता निधीतून जलदरीत्या रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याच्या सूचना दिल्या आहेत. 25 नोव्हेंबरपासून वैद्यकीय सहाय्यतेसाठी कालपर्यंत 587 अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी जवळपास 495 प्रकरणे मंजूर झाली असून महात्मा फुले जन आरोग्य योजना, धर्मादाय रुग्णालये आणि मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून मदत देण्याची कार्यवाही सुरू आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे प्राप्त होणाऱया अर्जावर कार्यवाहीसाठी विशिष्ट कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. प्राप्त होणाऱया अर्जापैकी महात्मा फुले जनआरोग्य योजनेसाठी पात्र रुग्णांना योजनेच्या पॅनलवरील रुग्णालयाकडे उपचारासाठी पाठविण्यात येते. अशा 192 प्रकरणांत रुग्णांना या योजनेचा लाभ दिला आहे. रुग्ण धर्मादाय रुग्णालयात उपचार घेत असल्यास धर्मादाय आयुक्तांच्या संकेतस्थळावरून संबंधित रुग्णालयात आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील किंवा दारिद्रय़रेषेखालील घटकांसाठी उपलब्ध खाटांची माहिती घेतली जाते. पात्र रुग्णांना याअंतर्गत पूर्णतः मोफत किंवा 50 टक्के सवलतीच्या दराने उपचार प्राप्त होतात. अशी 87 प्रकरणे धर्मादाय रुग्णालयांकडे पाठविण्यात आली आहेत. याशिवाय कॉकेलर इम्प्लांटची प्रकरणे पुणे येथील अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा यांच्याकडून हाताळली जातात. त्यांच्याकडे 9 प्रकरणे पाठविण्यात आली आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजना, धर्मादाय रुग्णालये आणि कॉकेलर इम्प्लांट अशा पद्धतीने 288 रुग्णांना मदत देण्यात आली आहे. उर्वरित 207 रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत देण्याचे निश्चित करण्यात आले असून 106 प्रकरणांत थेट रुग्णालयांकडे मदत वितरित केली आहे. उर्वरित प्रकरणांत कार्यवाही सुरू आहे. 50 प्रकरणांत अपूर्ण कागदपत्रे असल्याने कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्यात आला आहे.

एसएमएस सेवा सुरू करणार

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाकडे मदतीसाठी प्राप्त होणाऱया अर्जाची स्थिती रुग्णांना कळावी म्हणून एसएमएस सेवा सुरू करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. यानुसार एसएमएस सेवा सुरू करण्याबाबतही कार्यवाही सुरू आहे, असेही सहाय्यता निधी कार्यालयाद्वारे कळविण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या