उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी हा रामलल्लांचा आशीर्वाद!

3333

महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद शिवसेनेला मिळाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले हा प्रभू रामचंद्रांचाच आशीर्वाद आहे. त्यांच्याच कृपेने महाविकास आघाडी सरकारने दमदार शंभर दिवस पूर्ण केले. हेच निमित्त साधून उद्धव ठाकरे हे पुन्हा अयोध्येत रामललांचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत, अशी माहिती शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली. हा संपूर्ण धार्मिक कार्यक्रम आह़े यात कोणतेही राजकारण नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे तसेच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे शनिवार, 7 मार्च रोजी अयोध्येत रामललांच्या दर्शनासाठी येत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या दौऱयाची जय्यत तयारी करण्यात आली असून, संपूर्ण अयोध्येत भगवे तुफान उसळले आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, उत्तर प्रदेशचे अनिल सिंह यांची उपस्थिती होती. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच त्यांनी हा संपूर्ण कार्यक्रम धार्मिक असल्याचे स्पष्ट केले. रामललांच्या कृपेमुळेच शिवसेनेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद मिळाले. हा आमच्या आस्थेचा, श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे कोण विरोध करतेय, त्याला आम्ही महत्त्व देत नाही, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले. जम्मू-कश्मीरमध्ये भाजपने महबूबा मुफ्तीबरोबर सरकार बनवले होते. तेव्हा कुणी का विरोध केला नाही, असा सवालही त्यांनी केला.

अयोध्या ही सर्वांची आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे गुजरात, राजस्थानात मंदिरामध्ये गेले होते. महात्मा गांधींनीच रामराज्याची संकल्पना मांडली. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी अयोध्येत यावे. काँग्रेसच कशाला, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेसनेही अयोध्येत यावे, असे संजय राऊत म्हणाले.

अयोध्या आंदोलनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मोलाचे योगदान आहे. अयोध्येतील घराघरांत आजही त्यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यामुळेच शिवसेनेचे अयोध्येशी भावनिक नाते आहे. हे नाते जपण्यासाठीच महाराष्ट्रातून हजारो शिवसैनिकांचा जत्था अयोध्येत येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

शरयू आरती स्थगित

देशभरात सध्या कोरोना व्हायरसची दहशत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गर्दीचे कार्यक्रम टाळावेत, अशी सूचना केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही अशीच विनंती केली. सरकारच्या या मताशी आम्ही सहमत आहोत. त्यामुळे शरयू आरतीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

असा आहे दौरा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विशेष विमानाने लखनौ येथे आगमन होणार आहे. त्यानंतर लखनौहून त्यांचा काफिला कारने अयोध्येकडे रवाना होईल. दुपारी 3.30 वाजता ते पत्रकारांशी संवाद साधणार असून, 4.30 वाजता ते रामललांचे दर्शन घेतील.

महाराष्ट्रातील सरकार भक्कम

महाराष्ट्रातील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे सरकार भक्कम आहे. हे सरकार केवळ पाचच नाही तर पुढील पंधरा वर्षे टिकेल, असा आत्मविश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.

मंदिर निर्माणाचे काम राष्ट्रीय

अयोध्येतील राममंदिर निर्माणाचे काम सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून होत आहे. हे राष्ट्रीय काम आह़े त्याचा कुणीही धर्माशी संबंध जोडू नये, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट बजावले. अयोध्येच्या आंदोलनात शिवसैनिकांनी आपली आहुती दिली आहे. आमच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आह़े मंदिर हे सर्वांचेच आहे, ती कुणाची जागीर नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

जयंत पाटलांच्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिणार

महाराष्ट्राचे अर्थमंत्री जयंत पाटील हे ‘मुनगुंटीवार के हसीन सपने’ हे पुस्तक लिहिणार आहेत. या पुस्तकाची प्रस्तावना मी लिहिणार आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या