राम मंदिरासाठीचे कर्तव्य पार पाडल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे अभिनंदन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

2008
uddhav thackeray

अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रस्टची स्थापना केल्याची घोषणा बुधवारी लोकसभेत केली. याची घोषणा होताच सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे.

‘अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणी करण्याचा ऐतिहासिक निर्णय देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्या निर्णयाची अंमलबजावणी करणे हे सरकारचे कर्तव्यच होते. पंतप्रधान मोदी यांनी न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे कर्तव्य पार पाडल्याबद्दल अभिनंदन’, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी ट्रस्टची स्थापना केल्याची घोषणा केली. श्री राम जन्मभूमी तीर्थभूमी ट्रस्ट असे या ट्रस्टचे नाव असून या ट्रस्टला राम मंदिर निर्मितीचे सर्व निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य राहिल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. याबाबतचे एक निवेदन त्यांनी बुधवारी लोकसभेत केले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या ट्रस्टची निर्मिती करण्यात आली असल्याचे मोदींनी स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार या ट्रस्टला 67 एकर जमीन हस्तांतरित केली जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या