मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तत्परता, पोलिसांनी अर्ध्या तासात सोडले शेतकऱ्याचे वाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेतीच्या कामासाठी डिझेल भरण्यासाठी आणलेला ट्रॅक्टर हिंगोली पोलिसांकडून शनिवारी सकाळी ताब्यात घेण्यात आले होते. शेतकऱ्याची ही व्यथा शिवसेनेचे हिंगोली लोकसभा सहसंपर्कप्रमुख डॉ. रमेश शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एसएमएसद्वारे कळवताच अवघ्या अर्ध्या तासात पोलिसांनी शेतकऱ्याचे वाहन सोडून दिले.

हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतशिवारात सध्या हळदीसह गहू, हरभरा काढण्याचे काम सुरू आहे. हळद काढण्याच्या यंत्रासाठी शेतकऱ्यांना डिझेलची आवश्यकता पडते. हिंगोली तालुक्यातील केसापूर येथील शेतकरी ज्ञानदेव टेकाळे हे हिंगोलीत डिझेल भरण्यासाठी एका पेट्रोल पंपावर ट्रॅक्टर घेऊन आले होते. हिंगोली ग्रामीणचे पोलिस निरीक्षक अंगद सुडके व पोलिस कर्मचाऱ्यांनी टेकाळे यांचा ट्रॅक्टर ताब्यात घेतले. टेकाळे यांनी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख डॉ. रमेश शिंदे यांना याबाबतची माहिती दिली. शिंदे यांनी हिंगोली ग्रामीण पोलिसांना संपर्क साधल्यावर पोलिसांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यानंतर डॉ. रमेश शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भ्रमणध्वनीवर या अडचणीबाबत संदेश पाठवला. त्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ पातळीवरून सूचना देताच शेतकऱ्याचे हे वाहन पोलिसांनी सोडून दिले.

औंढा तालुक्यातील शिरला येथील शेतकरी बाळू पाटील यांना केलेल्या मदतीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून हिंगोली जिल्ह्यातील ज्ञानदेव टेकाळे या शेतकऱ्याला देखील मदत झाली आहे. व्यस्त वेळापत्रकात देखील मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडून शेतकऱ्यांच्या अडचणीची दखल घेऊन तातडीने सोडविल्या जात असल्यामुळे उद्धवठाकरे यांच्या रूपाने महाराष्ट्राला कार्यतत्पर तसेच शेतकऱ्यां प्रति आस्था असलेले मुख्यमंत्री मिळाले असल्याची प्रतिक्रिया सहसंपर्कप्रमुख डॉ. रमेश शिंदे यांनी दिली आहे.