
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आज संभाजीनगर येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी कॅबिनेट मंत्री सुभाष देसाई, एकनाथ शिंदे आणि गुलाबराव पाटील यांचे उद्धव ठाकरे यांनी आभार मानले. ‘देसाई साहेब, एकनाथजी आणि गुलाबराव मी तुम्हाला धन्यवाद देतो. कारण गेल्या वर्षात आपण काय काय केलं याचा तुम्ही आढावा घेतलात. नुसती कामं सांगितली म्हणून धन्यवाद नाही दिले तर घरी बसून मी काय केलं हे लोकांना सांगितलंत म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
”लोकांना मी सांगितलं होतं की घरी रहा, सुरक्षित रहा. पण, घरी बसून सुद्धा आपण काय काय कामं केली ते आता कळेल. या भूमिपूजनातून आता सुरुवात झाली आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आवडत्या संभाजीनगरमधून याची ‘बोहनी’ झाली आहे. आजचं रिमोटने केलेलं हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे अनावरण हा एक योगायोग आहे. इथे प्रत्यक्ष भूमिपूजन केलं आणि ज्यांची ओळख रिमोट कंट्रोल होती त्यांच्या स्मारकाचे उद्घाटन देखील रिमोट कंट्रोलने झालं हा एक योगायोग आहे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे, पाणी योजना. अनेक वर्षांपासून चालूच आहे, दरवेळेला ते यायचे आणि म्हणायचे की आता सुरू करतो, आम्हाला पण बरं वाटायचं… पण पुढे काय? गायब. काय आणि कसं अडलं होतं त्याची कल्पना नाही. लेझीमसारखं चार पावलं मागे, दोन पावलं पुढे… पण, आता आम्ही फक्त घोषणा करणार नाही. माझ्या कावडीने जर कोणाच्या घरात पाणी येत असेल, त्यांची तहान भागत असेल तर ते मोठं पुण्य आहे आणि ते मिळवायला भाग्य लागतं. संदिपानजी म्हणाले पैठणमध्येही पाणीटंचाई आहे. मी पैठणला जाईन माझी कावड घेऊन, असे यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
” गेली अनेक वर्षे मी शिवसेनाप्रमुखांच्या सभेला इकडे यायचो. त्यानंतर प्रचाराला इकडे येतो. प्रचार असला की आम्ही ओरडून सांगतो, लवकरच पाणी योजना आणू. पण, आज त्याचं भूमिपूजन झालं आहे आणि भूमिपूजन करून गप्प बसणार नाही. मी कधीही न सांगता, न कल्पना देता या कामाची प्रगती बघायला येईन. मी गेल्या आठवड्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची पाहणी केली. नागपूरपासून शिर्डीपर्यंतचा हा महामार्ग 1 मेपर्यंत सुरू होतोय. नुसत्या घोषणा नाहीत, कामांना गतीही देतोय. गती नसेल तर त्याला काही अर्थ नसेल. हा महामार्ग झाल्यानंतर संभाजीनगरचे महत्त्व आणखी वाढणार आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
”आम्ही सांगत होतो की पाण्याचा प्रश्न, गुंठेवारीचा प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही. या शहराच्या गुंठेवारीच्या बाबतीत मी सकाळीच सूचना दिल्या आहेत आणि तोही प्रश्न लवकरात लवकर सोडवल्याशिवाय राहणार नाही. सिडकोतील घरांचा प्रश्न, मालकी हक्काचा प्रश्न याबद्दलही सूचना दिल्या आहेत. शिवसेनाप्रमुखांचे स्मारक त्यांच्या लाडक्या शहरात होत आहे. नुसता पुतळा नाही उभा करणार. शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्या हयातीमध्ये संभाजीनगरला दिलं ते प्रखर हिंदुत्ववाद, राष्ट्रीयत्व विचार सांगणारे ते स्मारक असेल. “हिंदुत्त्व म्हणजेच राष्ट्रीयत्व” हे नेमकं काय आहे, हे त्यामध्ये कळेल.”, असे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.
कोरोनाचे आकडे खाली आलेत म्हणून मास्क खाली करू नका. साथीच्या रोगांसोबत कोरोना आला तर बिकट संकट आपल्यावर आल्याशिवाय राहणार नाही, पण ते येणार नाही ही मला खात्री आहे कारण आपण सगळे समजूतदार आहात, असा सल्ला यावेळी त्यांनी दिला.
































































