मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या कोकणात, शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवारपासून दोन दिवसांच्या कोकण दौऱयावर येत आहेत. गणपतीपुळ्याचा गणपती आणि आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या दर्शनाबरोबरच सिंधुदुर्ग किल्ल्याची आणि चिपी विमानतळाच्या कामाची पाहणी असे कार्यक्रम या दौऱयात ठरलेले आहेत. बरोबरच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यातील विकासकामांचा आढावाही उद्धव ठाकरे यावेळी घेणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच कोकण दौरा असल्याने कोकणातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱयांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. उद्धव ठाकरे यांच्या स्वागताची ठिकठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱयाबाबत माहिती दिली. 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरे यांचे हेलिकॉप्टरने गणपतीपुळे येथे आगमन होणार आहे. सर्वप्रथम ते गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. श्रीदेव गणपतीपुळे देवस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येईल आणि त्यानंतर गणपतीपुळे विकास आराखडा कामाच्या भूमिपूजन कोनशिलेचे त्यांच्या हस्ते अनावरण होईल. यावेळी शिवसेना नेते आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, रत्नागिरीचे पालकमंत्री ऍड. अनिल परब, खासदार विनायक राऊत आदी उपस्थित राहणार आहेत. गणपतीपुळे येथून निघाल्यानंतर उद्धव ठाकरे हे दुपारी दोनच्या सुमारास मालवणच्या आंगणेवाडी येथे भराडी मातेचे दर्शन घेतील. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता ते सिंधुदुर्गनगरी येथे जिह्यातील विकासकामांचा आढावा घेणार आहेत.

मंगळवार 18 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे हे सकाळी नऊ वाजता रत्नागिरी जिल्ह्याचा आढावा घेणार आहेत. या बैठकीला दोन्ही जिह्यांचे पालकमंत्री तसेच नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, कृषिमंत्री दादा भुसे आदी उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे हे सकाळी सिंधुदुर्गनगरी येथून हेलिकॉप्टरने सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊन पाहणी करणार आहेत. त्यानंतर चिपी विमानतळाच्या कामाची पाहणी करून विमानतळासंदर्भात बैठक घेणार आहेत, अशीही माहिती जिल्हाधिकाऱयांनी यावेळी दिली.

मुंबईतील वाहतूककोंडीवर एक प्रभावी उपाय म्हणून कोस्टल रोड प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. हाजी अलीजवळील समुद्रात सुरू असलेल्या कोस्टल रोडच्या कामाचे उंचावरून टिपलेले हे दृश्य. 29.2 किलोमीटर लांबीचा हा कोस्टल रोड आठ पदरी असणार आहे. या मार्गामुळे दक्षिण मुंबई ते पश्चिम उपनगरदरम्यानच्या प्रवासाचा वेळ 2 तास 40 मिनिटांनी कमी होणार आहे.