अहमद पटेल यांच्या निधनाने काँग्रेसने ‘चाणक्य’ गमावला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ज्येष्ठ अनुभवी नेते अहमद पटेल यांच्या निधनाने काँग्रेसने ‘चाणक्य’ गमावला आहे. राज्यात महाविकास आघाडी स्थापन करण्यात अहमद पटेल यांची मोठी भूमिका होती. अहमद पटेल हे काँग्रेस पक्षाचे चाणक्य समजले जात. पक्षाला प्रत्येक प्रसंगात त्यांचा आधार होता,अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी अहमद पटेल यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

केवळ राजकीय आघाडीवरच ते सक्रीय होते असे नव्हे तर अनेक सामाजिक कार्यांशी त्यांचा जवळचा संबंध होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताना अहमद पटेल यांच्या मार्गदर्शनाचा आणि अनुभवाचा आम्हाला खूप उपयोग झाला, असेही मुख्यमंत्री म्हणाले.त्यांच्या निधनाने काँग्रेस तसेच महाविकास आघाडीने आपला मार्गदर्शक गमावला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी अहमद पटेल यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले – अशोक चव्हाण
ज्येष्ठ नेते व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष खासदार अहमद पटेल यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. त्यांच्या निधनाने एक अभ्यासू, जाणकार आणि उत्तम संघटनात्मक कौशल्य असलेले समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. अहमद पटेल हे राष्ट्रीय राजकारणातील अत्यंत प्रभावशाली नेते होते, असे  काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

एक मुत्सद्दी राजकारणी आणि पेचप्रसंगांमध्ये कौशल्याने तोडगा काढणारे नेते म्हणून परिचित होते. देशाच्या कानाकोपऱ्यातील राजकारण आणि काँग्रेसच्या संघटनेचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. आयुष्यभर त्यांनी काँग्रेस पक्षाची सेवा केली. मात्र कधीही वैयक्तिक महत्त्वाकांक्षा बाळगली नाही. नेहमी व्यापक पक्षहित डोळ्यासमोर ठेवून काम केले, असेही ते म्हणाले.

मागील अनेक वर्षांपासून आपण अहमद पटेल यांच्या संपर्कात होतो. विविध कामानिमित्त त्यांच्या भेटीगाठी व विस्तृत चर्चा होत असत. आपल्या जबाबदारी विषयी त्यांची कटिबद्धता विलक्षण होती. साधेपणा, संयमी व मुद्देसूद संभाषण असे त्यांचे अनेक स्वभाव गुण प्रत्येकाच्या मनाला भावणारे होते. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांचे कार्य आणि त्यांचे व्यक्तिमत्व दीर्घकाळ प्रत्येकाच्या स्मरणात राहिल. अहमद पटेल यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दांत अशोक चव्हाण यांनी अहमद पटेल यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या