
कोरोना हा जगाच्या चिंतेचा विषय बनलेला असताना हिंदुस्थानात कोरोनाविरुद्धच्या लढाईत महाराष्ट्राने एक पाऊल पुढे टाकल्याने या महामारीच्या संकटातून देश सावरताना दिसत आहे. एक किंवा दीड महिन्यापूर्वी अनेक देशांमध्ये कोरोनाची स्थिती हिंदुस्थानसारखीच होती. मात्र आज या सर्व देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 25 ते 30 टक्क्यांनी जास्त आहे. या सर्व देशांमध्ये अनेकांचे दुर्दैवी मृत्यू झाले आहेत. हिंदुस्थानात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. जर महाराष्ट्राने वेळीच सर्वसमावेशक आणि एकात्मिक उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला नसता, त्वरित आणि निर्णायक कृती केली नसती, तर राज्यातील आणि देशातील स्थितीही पूर्णपणे वेगळी राहिली असती.
कोरोना विरुद्धची लढाई जिंकणारच, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या जागतिक महामारीवर मात करण्यासाठी शिवधनुष्य उचलले आहे. त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि राज्यातील विरोधी पक्षही जोमाने काम करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः जातीने लक्ष घालत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यातील उद्योजक, डॉक्टर, प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी यांच्याशी दूरध्वनी तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून, कोविड-19 विरुद्धच्या उपाययोजनांबाबत थेट माहिती घेत आहेत. राज्याच्या कानाकोपऱयातल्या डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधूनत्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांना प्रोत्साहनही देत आहेत.
कोविड-19 विरुद्ध लढा देण्यासाठीचे उपाय आणि मार्ग याबाबत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने संबंधित अधिकारी व जनतेशी संवाद साधून मार्ग काढत आहेत. सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना आणि उचलण्यात येत असलेली पावले याबाबत काटेकोर अंमलबजावणी करणे तसेच लॉकाडाऊनमुळे उद्भवणारी परिस्थिती व कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी विषयानुरुप मंत्रिमंडळ उपसमिती तसेच आरोग्य अधिकाऱयांचे गट तयार करून परिस्थिती हाताळण्यात येत आहे. मंत्रालयात त्यासाठी एक वॉररुमही कार्यरत करण्यात आली असून राज्यातील परिस्थितीवर ते सात्याने लक्ष ठेवून आहेत.
लॉकडाऊन लागू केल्यामुळे हिंदुस्थानातील कोरोनाचा प्रसार नियंत्रित आहे. देशाच्या व राज्याच्या अर्थव्यवस्थेला याचा खूप मोठा फटका बसणार आहे, हे जरी खरं असलं तरी, देशातील अनेक लोकांची आयुष्ये वाचवण्यासाठी हाच मार्ग योग्य ठरणार आहे. कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वप्रथम ‘होम फ्रॉम वर्क’चे आदेश राज्यातील उद्योजकांना विश्वासात घेऊन दिले, आणि लॉकडाऊनसारखे कठोर पाऊल उचलले. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने पाहिल्यास, हे आपल्याला खूप महागात पडणारे असले तरी राज्यातील जनतेच्या जीवाचा विचार करता कोरोनाचा प्रसार रोखण्यात ते महत्वूर्ण ठरताना दिसत आहे. महाराष्ट्रापाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभर लॉकडाऊन लागू केला. देशातील जनतेच्या आयुष्याचा विचार करता अतिशय तुटपुंजी साधने असतांनाही कोरोनुळे उद्भवलेल्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी निवडलेल्या मार्गामुळे संपूर्ण जग भयभीत झालेल असताना कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपण जिंकणारच, असे आशादायक चित्र देशात व राज्यात निर्माण झाले आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन राज्य सरकारकडून वेळीच उपायोजना करण्यात आल्या. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वप्रथम ज्या विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमाने येतात तेथे तपासणीची सोय करण्यात आली. मुंबई, पुणे, नागपूर येथील विमानतळांवर थर्मल स्कॅनिंगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पंचतारांकीत हॉटेलमध्ये येणाऱया परदेशी नागरिकांचीही तपासणी करण्यात आली. कोरोनाबाबत नमुने तपासण्याची सुविधा पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्था, तसेच मुंबई आणि नागपूर येथेही याची सोय करण्यात आली. प्रसंगी खासगी रुग्णालयांची देखील मदत घेण्यात येत आहे.
पंधराशे माजी आमदार मदतीसाठी सरसावले
राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दूर करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर उपाययोजना केल्या जात आहेत. लॉकडाऊनमुळे गोरगरीबांना अन्नधान्य पुरवणे, गरजूंना औषध पुरवणे, उपचारासाठी उपाययोजना करणे यासाठी मोठय़ा प्रमाणावर निधीची आवश्यकता असणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील पंधराशे माजी आमदार मदतीसाठी पुढे सरसावले आहे. माजी आमदार समन्वय समितीने कोरोना विषाणू विरुद्धच्या लढय़ात आर्थिक मदतीचा हात पुढे करत त्यांच्या एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
परराज्यांतील मजुरांची काळजी
जिथे आहात तिथेच थांबा, तुमची जबाबदारी महाराष्ट्र सरकारची. इतर राज्यातून आलेले मजूर, कामगार घरी जाण्यासाठी परत निघाल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रभर दिसत आहे. राज्य शासनाने त्यांची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. राज्यभर त्यांच्यासाठी 163 केंद्रे सुरू झाली असून तिथे त्यांची राहण्याची आणि मोफत जेवण्याची सोय केली आहे.महाराष्ट्रातील जे लोक इतर राज्यांत अडकले असतील त्यांना मदत मिळवून देण्यासाठी राज्य सरकार व मुख्यमंत्री कार्यालयाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.
कोरोना विषाणूची चाचणी करण्यासाठी जानेवारी महिन्यात आपल्या देशात फक्त एकच प्रयोगशाळा होती, मात्र आता 220 प्रयोगशाळा आहेत. जागतिक अनुभवावरून असे दिसते की, प्रत्येक दहा हजार रूग्णांसाठी देशात किमान 1500 ते 1600 खाटा उपलब्ध असाव्यात. मात्र आज आपल्या देशात एक लाखाहून अधिक खाटा तयार असून 600 कोरोना समर्पित रुग्णालये उभारण्यात आली आहेत. कोरोना विरुद्धच्या लढाईत इतर देशांची तुलना करता हिंदुस्थान पुढे असल्याचे दिसून येत आहे.जपान एक रुग्ण शोधण्यासाठी 11.7 चाचण्या करतो. इटली 6.7 तर अमेरिका 5.3 चाचण्या करत आहे. दुसरीकडे हिंदुस्थानात इतर देशांच्या तुलनेत अनेक पटीने चाचण्या केल्या जात आहेत. या व्यतिरिक्त ज्या भागात कोरोनाचा शिरकाव झालेला नाही, त्या भागात सर्दी, खोकला आणि श्वसनाच्या आजाराने त्रस्त नागरिकांचीही तपासणी केली जाते.
कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश
देशात 10 लाख लोकसंख्येमागे कोरोनाचे केवळ 9 रुग्ण आहेत. तर जगात हे प्रमाण सरासरी 267 रुग्ण आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार प्रति 10 लाख लोकसंख्येमागे अमेरिकेत 1946, इटली 3864, स्पेन 2732, फ्रान्स 2265, जर्मनी 1608 असे रुग्ण आढळून येत असल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेसारख्या विकसनशील देशात तर रुग्णांचा आकडा रोज दुपटीने वाढत आहेत. जगातील अन्य देशांची तुलना करता हिंदुस्थानात रुग्णांचे प्रमाण अनेक पटीने कमी आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून आले असले तरी राज्य सरकारकडून करण्यात येणाऱया विविध उपाययोजनांमुळे कोरोना विषाणूचा प्रभाव कमी होताना दिसत आहे.
कुंचलाही शस्त्र बनला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाविरुद्ध लढाईत सहभागी व्हा असे आवाहन जे. जे. मधील चित्रकारांना केले होते. यानंतर ‘जे.जे.’तील कुंचलाही आता शस्त्र बनला आहे आणि ‘घरी राहा, सुरक्षित राहा’ असा संदेश विविध चित्ररूपांच्या माध्यमातून राज्यभरात व्हायरल होत आहे. मुख्यमंत्र्यांचे मित्र आणि प्रसिद्ध डिझाईन तज्ञ भूपाल रामनाथकर यांनी जे. जे.तील आजी-माजी विद्यार्थ्यांना आवाहन केले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि तब्बल 2 हजार पोस्टर्स तयार झाली असून सोशल मीडियावर ही चित्रे प्रसिद्ध झाली आहेत.
ठळक मुद्दे
राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर राज्य सरकारने तत्काळ पावले उचलली. अर्थसंकल्पीय अधिवेशन आठवडाभर आधीच आटोपते घेण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
पालकमंत्री, जिह्यातील अधिकारी यांना तत्काळ आपापल्या जिह्यात जाऊन उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले.
केंद्र सरकारने चीन, दक्षिण कोरीया, इटली, फान्स, जर्मनी क इराणमधून आलेल्या प्रकाशांचे स्क्रीनिंग करण्याचे निर्देश दिले असताना दुबईहून आलेल्या प्रवाशांनाही कोरोना झाल्याचे आढळले. त्यानंतर तत्काळ परदेशातून येणाऱया सर्व प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्याचे निर्देश दिले.
पुण्यातील आणि त्या पाठोपाठ राज्यातील शाळा बंद करण्यात आल्या. सीनेमागृहे, नाटय़गृहे, सार्वजनिक कार्यक्रम, व्यायामशाळा, जलतरण तलाव यावर बंदी.
रेल्वे, बस तसेच सार्वजनिक वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी मंत्रालय तसेच सरकारी कार्यालयात 25 टक्केच कर्मचाऱयांची उपस्थिती अनिवार्य करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिली. खासगी क्षेत्रातील कंपन्यांनाही याच निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. यामुळे प्रवासी वाहतुकीवरील ताण कमी झाला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 16 मार्च रोजी महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे सर्व परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या. त्याचप्रमाणे नागरिकांना गर्दी टाळून स्वयंशिस्त पाळण्याचे आवाहन केले.
कोरोनाच्या चाचण्यांसाठी कस्तुरबा प्रमाणेच केईएम, हाफकीन येथे प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या. त्याचप्रमाणे सर्व खासगी रुग्णालयांना आयसोलेशन वॉर्ड सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले.
20 मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यभरात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने तसेच कार्यालये बंद करण्याची घोषणा केली. त्यापाठोपाठ केंद्र सरकारने 21 मार्च रोजी 1 दिवसाच्या जनता कर्फ्युची घोषणा केली. हा लॉकडाऊन पुढे केंद्राकडून 14 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आल्याची घोषणा केली.
























































