घरं विकून मुंबईवरचा हक्क गमावू नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गिरणी कामगारांना आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गिरणी कामगार हाच मुंबईचा खरा चेहरा आहे. त्यांना हक्काचा निवारा मिळावा म्हणून सरकार म्हाडाच्या माध्यमातून सवलतीत घरे उपलब्ध करून देत आहे. पण कृपा करून ही घरं विकून मुंबईवरचा तुमचा हक्क गमावू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज गिरणी कामगारांना केले. तसेच एकाही गिरणी कामगाराला बेघर ठेवणार नाही. तुमच्यासाठी जे काही करता येईल ते करण्यासाठी वचनबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

म्हाडाच्या वतीने गिरणी कामगारांसाठी मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी बॉम्बे डाईंग टेक्सटाईल मिल, बॉम्बे डाईंग प्रिंग मिल आणि श्रीनिवास मिलच्या जागेवर 3 हजार 894 घरे उभारली आहेत. त्या घरांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत लॉटरी काढण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

मुंबई महाराष्ट्राला मिळाली नाही, तर ती रक्त सांडून मिळवली आहे. गिरणी कामगारांनी छातीचा कोट करून हक्काने मिळवली आहे. त्यामुळेच गिरणी कामगार मुंबईचा चेहरा आहे, ती ओळख पुसू नका, असे सांगतानाच ही घरं तुमच्यासाठी देतोय, ती विकणार नाही असं वचनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कामगारांकडे मागितले, तेव्हा हजारो कामगारांनी हात उंचावून सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे विजय नाहटा, महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेना उपनेते सचिन अहिर, म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर, ‘नवाकाळ’च्या संपादिका जयश्री खाडिलकर आदी उपस्थित होते.

1 एप्रिल रोजी गिरणी कामगारांसाठी 6,500 घरांची लॉटरी
आज बॉम्बे डाईंग टेक्सटाईल मिल, बॉम्बे डाईंग प्रिंग मिल आणि श्रीनिवास मिलमधील कामगारांसाठी 3 हजार 894 घरांची लॉटरी काढली आहे, तर पुढे 1 एप्रिल रोजी गिरणी कामगारांसाठी पनवेल तालुक्यातील कोन येथील तब्बल साडेसहा हजार घरांची लॉटरी काढली जाणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले.

गिरणी कामगारांसाठी सुवर्ण दिवस- आदित्य ठाकरे
आपल्याला हक्काचे घर कधी मिळणार असा सवाल गिरणी कामगार वारंवार व्यक्त करतात. त्यासाठी त्यांनी मोर्चे, आंदोलने केली आहेत. त्यामुळेच आजच्या लॉटरीच्या माध्यमातून त्यांना हक्काचे घर मिळणार आहे. त्यामुळे खऱया अर्थाने गिरणी कामगारांसाठी आजचा सुवर्ण दिवस असल्याचे मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसेच शेवटच्या गिरणी कामगाराला घर मिळेपर्यंत आपण पाठपुरावा करणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी गिरणी कामगारांच्या वतीने आदित्य ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला.

पुढील चार वर्षांत म्हाडा मुंबईत 50 हजार परवडणारी घरे बांधणार – जितेंद्र आव्हाड
मुंबईत परवडणाऱया घरांची नितांत आवश्यकता आहे. पोलीस, चतुर्थ श्रेणी कामगारांबरोबरच सर्वसामान्यांनाही हक्काचे घर मिळाले पाहिजे त्यासाठी म्हाडा पुढील चार वर्षांत मुंबईत तब्बल पन्नास हजार परवडणारी घरे बांधणार असल्याची घोषणा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केली. तसेच महाराष्ट्राला मोठय़ा मनाचे मुख्यमंत्री लाभलेले आहेत. ते महाराष्ट्राला मोठं करण्याचं शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार करतील, असेही आव्हाड म्हणाले.

यापुढे घरासाठी मोर्चा काढावा लागणार नाही
गिरणी कामगार ही मुंबईची ओळख, पण हाच गिरणी कामगार मुंबईत उपरा होणार असेल तर मुंबई मिळवून उपयोगच काय असा सवाल करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, गिरणी कामगारांसाठी जे काही आणि जेवढे काही करता येईल ते आम्ही करणार आहोत. यापुढे घरांसाठी मोर्चा काढण्याची वेळ कामगारांवर येणार नाही, असा शब्दही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

घरांची किंमत साडेनऊ लाख रुपये
गिरणी कामगारांना दिल्या जाणाऱया घरांची किंमत म्हाडाने साडेअठरा लाख रुपये निश्चित केली होती. ती किंमत परवडणार नसल्याने कमी करावी अशी मागणी कामगारांकडून केली जात होती. त्याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घरांच्या किमती तब्बल नऊ लाख रुपयांनी कमी करत केवळ साडेनऊ लाख रुपये किंमत निश्चित केली. त्यामुळे कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गिरणी कामगार आणि शिवसेना एकाच कुगिरणी कामगार शिवसेनेच्या हृदयातटुंबातील आहेत. शिवसेनेने आतापर्यंत अनेक नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री केले. ते केवळ गिरणी कामगारांच्या पाठिंब्यावरच. म्हणूनच गिरणी कामगार शिवसेनेच्या हृदयात आहेत. आज तुम्हाला घरं देण्यासाठी इथे आलो असलो तरी तुमच्यावर कोणतेही उपकार करत नाही. उलट तुमचेच आमच्यावर ऋण आहेत, ते व्यक्त करण्यासाठी आलोय, त्यामधून कधीच मुक्त होऊ शकत नाही असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.