
देशाच्या औद्योगिक प्रगतीत महाराष्ट्राला भरीव योगदान द्यायचे आहे. त्यामुळे राज्यातील उद्योजकांनी ‘मेड ईन महाराष्ट्रचा’ दबदबा वाढविण्यासाठी जगात राज्याची नवी ओळख निर्माण करणारा नवा प्रकल्प सादर करावा, त्यासाठी सर्व सहकार्य करण्याचे मी वचन देतो, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्योजकांना विश्वास दिला.
सीआयआयच्या वतीने काल आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत राज्यातील प्रमुख उद्योजकांसोबत ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या उपस्थितीत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये उद्योजक सुनील माथूर, जमशेदजी गोदरेज, हर्ष गोयंका, बी. त्यागराजन आदींनी भाग घेतला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, औद्योगिक क्षेत्राला प्रोत्साहन देणारे 16 हजार कोटींचे सामंजस्य करार नुकतेच करण्यात आले. उद्योजकांनी राज्यात गुंतकणूक करण्यासाठी विश्वास दाखविला आहे हे लक्षात येते. आपल्याकडे सगळ्या जगाची भूक भागवण्याची क्षमता आहे. त्यासाठी कृषी क्षेत्रात शीतसाखळी तयार करण्याची आवश्यकता आहे. बदलत्या गरजांनुसार बदलते व्यवसाय येणे आवश्यक आहेत. जर उद्योजकांनी नवे प्रकल्प सादर केले तर त्यांना कोणत्याही अडचणीशिवाय चोवीस तासांच्या आत सर्व परवाने देऊन प्रकल्प सुरु करण्याची हमी मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून ग्रामीण-शहरीभाग एकसमान पातळीवर
कोरोनामुळे राज्यात आर्थिक संकट निर्माण झाले आहे. मात्र अशा संकटातून संधी शोधण्याची शिकवण मला मिळालेली असल्याने मी याच्या सकारात्मक परिणामावरही विचार केला आहे. या काळात अनेकांना नाईलाजाने वर्क फ्रॉम होम करावे लागले होते. मात्र नजिकच्या भविष्यकाळात कर्मचारी घरुनच काम करतील. त्यासाठी आवश्यक असणारे नेटवर्क ग्रामीण भागात पोहोचवून ग्रामीण आणि शहरी भाग एका पातळीवर आणण्याचा प्रयत्न करणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
स्थानिकांना प्राधान्य द्या – सुभाष देसाई
स्थलांतरित मजुरांच्या जाण्यामुळे रिक्त झालेल्या औद्योगिक क्षेत्रातील जागांवर स्थानिकांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी उद्योजकांना केले. औद्योगिक कामगार ब्यूरोमुळे नोकरी शोधणारे आणि नोकरी मागणारे यांच्यामधली दरी दूर होणार आहे.
जीवनमान सुधारण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन
राज्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी झोपडपट्टय़ांमधून लोकांचे पुनर्वसन करण्यावर भर देणार आहे. मुंबईत जिथे पन्नास टक्के लोक आजही झोपडय़ांमधून राहतात तिथे बाथरूम, संडास, पिण्याचे पाणी याची सोय एकत्रित असते तिथे स्कच्छता आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. धारावीचे पुनर्वसन करण्याचा प्रकल्प लवकरच हाती घेण्याचा मानसही यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखकिला.



























































