
लाल फीत, दफ्तर दिरंगाई या शब्दांना हद्दपार करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अधिकाऱयांना दिले. सर्वसामान्यांच्या सुखासाठी काम करताना राज्याच्या प्रगतीची ‘गती’ कायम ठेवा. आपली निष्ठा, कर्तव्यभावना राज्य आणि देशाच्या विकासासाठी, सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी जपावी, असे आवाहनही त्यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानातील 18 पुरस्कारांचे वितरण आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
राजकीय नेतृत्व हे राज्याच्या हिताची आणि विकासाची स्वप्नं दाखवतात, परंतु ती सत्यात उतरवण्याचे काम प्रशासकीय यंत्रणेला करावे लागते. हे करत असताना सर्वसामान्यांचे दुःखाश्रू पुसले जाऊन तिथे आनंदाश्रू येतात तेव्हा प्रशासन चांगले काम करत आहे असे आपण मानतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.
शेतकऱयांना कायमस्वरूपी आपल्या पायावर उभे करणार
स्थूल उत्पन्नात चांगली वाढ होत आहे त्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. अर्थात हे सर्व प्रशासकीय यंत्रणेतील सहकाऱयांमुळे शक्य झाले. शेतकऱयांना कायमस्वरूपी आपल्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न असून यासाठी शेती आणि शेतकरी हिताच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.






























































