कोरोना दक्षता समिती स्थापन करा, युवकांना सहभागी करून घ्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

330

स्वातंत्र्यांच्या काळात देशभर जे वातावरण निर्माण झाले ते नागरिकांच्या आणि जनतेच्या सहभागामुळेच. नुकतेच चीन संदर्भात लोकांनी स्वतःहून चिनी वस्तूंवर बहिष्कार घालून एक मोठा संदेश दिला. त्याप्रमाणेच कोरोनाची ही लढाई फक्त सरकारची नाही. वाडय़ा आणि वस्त्या, कॉलनीजमध्ये नागरिकांच्या कोरोना दक्षता समित्या बनवा. स्वयंसेवी संस्था, युवकांना यात सहभागी करून घ्या, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ठाणे जिल्ह्यातील सर्व पालिका आयुक्तांची व्हीसीद्वारे बैठक घेऊन आढावा घेतला व महत्वाच्या सूचना केल्या. त्याचप्रमाणे मुंबई महापालिका अधिकारी तसेच स्वयंसेवी संस्थांशीही संवाद साधला.

कोरोनामुक्त मुंबईसाठी वॉर्डनिहाय पथक तयार करा!
मुंबई महापालिका प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून काम करतांना स्वयंसेवी संस्थांनी मुंबईत विशेषतः झोपडपट्टय़ांमध्ये वॉर्डनिहाय पथक स्थापन करून वस्त्या दत्तक घ्याव्यात, घरोघर जाऊन तपासणी करताना कोरोनामुक्त मुंबईच्या कामात जिद्दीने सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. नागरिक आणि प्रशासनात दुवा म्हणून काम करणारी स्वयंसेवी संस्थांची ही यंत्रणा कायमस्वरूपी मुंबईत कार्यरत राहावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

कोरोना दक्षता समिती स्थापन करा, लढाईत जनतेचा सहभाग वाढवा
एखाद्या गोष्टीवर जेव्हा जनभावना एकवटते तेव्हा निर्विवाद यश मिळतेच. गावपातळीकर कोरोना दक्षता समित्या स्थापन करण्याच्या सूचना मी दिल्या आहेत. जग, राज्य, जिल्ह्याची चिंता करण्याआधी प्रत्येक गावाने आपले गाव, घर, अंगण स्वच्छ ठेवण्याचे ठरवले तरी आपण कोरोनाला आणि पावसाळ्यातील आजारांना हरवू शकू.

आपली प्रतिक्रिया द्या