पायाभूत सुविधांचे प्रकल्प वेळेत पूर्ण करा! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन त्याचा अधिकाधिक नागरिकांना लाभ मिळावा तसेच सुरू केलेल्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करा, असे निर्देश देताना या योजना तसेच प्रकल्पांचा आपण स्वतःही दर आठवडय़ाला आढावा घेणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. सागरी किनारा मार्गाच्या कामाचाही त्यांनी आढावा घेतला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संकल्प कक्षातून आढावा घेण्यात येत असलेल्या योजनांची तसेच कामांची माहिती यावेळी घेतली. या वर्षी शासनाने अर्थसंकल्पाच्या माध्यमातून विकासाची पंचसूत्री जाहीर केली आहे. यातील महत्त्वाच्या विषयांचा, कामांचा पाठपुरावाही संकल्प कक्षामार्फत घेतला जावा. महाराष्ट्राच्या दृष्टीने अनेक प्रकल्प महत्वाचे आहेत. यापैकी काही योजना तसेच प्रकल्पांचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. काही कामे प्रगतिपथावर आहेत. या प्रकल्पांसह आपण संकल्पित केलेले विविध प्रकल्प वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावेत यासाठी त्यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करणे गरजेचे आहे.

यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री सचिवालयाचे प्रधान सल्लागार सीताराम पुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, माहिती-तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, इतर मंत्रालयीन अधिकारी उपस्थित होते.

टेलिमेडिसिनमध्ये माहिती-तंत्रज्ञान विभागाचे काम महत्त्वाचे

मुख्यमंत्र्यांनी आज माहिती-तंत्रज्ञान विभागाच्या कामाचा आढावा घेतला. यामध्ये अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेल्या टेलिमेडिसिन सुविधेमध्ये माहिती-तंत्रज्ञान विभागाचे काम महत्त्वपूर्ण असल्याचेही ते म्हणाले. राज्य शासनाच्या आतापर्यंतच्या तीनही अर्थसंकल्पामध्ये घोषित केलेल्या योजना तसेच प्रकल्पांच्या अंमलबजावणीचा नियमित आढावा घेऊन कोणत्या योजना पूर्ण झाल्या, कोणत्या मागे राहिल्या आहेत याचा पाठपुरावा करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

कोस्टल रोडचे 52 टक्के काम पूर्ण

सागरी किनारा मार्गाचे 52 टक्के भौतिक काम पूर्ण झाले आहे. निश्चित केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे काम सुरू आहे. हा प्रकल्प नियोजित वेळेत म्हणजे नोव्हेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी यावेळी दिली.