बा विठ्ठला… अवघ्या विश्वाला कोरोनामुक्त कर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विठुराया चरणी साकडे

745

कोरोनामुळे महाराष्ट्रासह देश तसेच जगावर मोठे संकट आले आहे. बा… विठ्ठला, कोरोनाचे हे संकट लवकरात लवकर दूर करून महाराष्ट्र आणि अवघ्या विश्वाला कोरोनामुक्त कर, बळीराजाला सुखी ठेव, सर्वांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण कर अन् समाधान व भरभराट येऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी आज घातले.

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची बुधवारी पहाटे शासकीय महापूजा करण्यात आली. मानाचे वारकरी म्हणून सन्मान मिळालेले नगरमधील पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर-पांगुळ गावचे भाविक विठ्ठल ज्ञानदेव बढे आणि सौ. अनुसया बढे हे दांपत्य मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेत सहभागी झाले होते. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने कार्यकारी अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या