आधी फाशी द्यायची, मग तपास करायचा हे बिलकूल होणार नाही! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना खडसावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हत्या असो की आत्महत्या, मृत्यू झाल्यानंतर त्याची चौकशी करणं हे सरकारचं काम आहे. पण विरोधक म्हणतात त्याप्रमाणे फाशी द्या आणि तपास करा, असा तपास होऊ शकत नाही. तपासाला दिशा देण्याचं काम कोणी करू नये, तपास हा निःपक्षपातीपणेच झाला पाहिजे. सरकार त्यांनीसुद्धा यापूर्वी चालवलं आहे, आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत होतो. एखाद्याला फाशी देऊन त्याची चौकशी करण्यापेक्षा चौकशी करून फाशी द्या ही आपल्या देशाची न्यायव्यवस्था आहे. ही पद्धत विरोधकांना बदलायची असेल तर तेही जनतेसमोर येऊ द्या, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विरोधकांना ठणकावले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी हिरेन आत्महत्या प्रकरणी विचारण्यात आले असता मुख्यमंत्री म्हणाले,  ज्याप्रमाणे हिरेन प्रकरण आहे, त्याचप्रमाणे मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाइड नोट लिहिली त्यात काही जणांची नावे आहेत. ती नावे सभागृहात समोर आहे. जिलेटिन कांडय़ांसंदर्भातही तपास सुरू झालेला आहे आणि तो व्यवस्थित सुरू आहे. पण ही एक नवीन पद्धत आली आहे की एखाद्याला टार्गेट करायचं. त्याच्या अब्रूचे धिंडवडे काढायचे आणि त्याचं चारित्र्यहनन केल्यानंतर, त्याला आयुष्यातून उठवल्यानंतर मग तपासात कळलं की तो त्याच्यात नाहीच आहे मग काय करायचं, असा सवाल करतानाच तपास सुरू आहे, तपासात जो कोणी सापडेल तो कोणीही असेल त्याच्यावर कारवाई करणारच, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

सभागृहाचे कामकाज पार पडावं म्हणून बदलीची तत्काळ घोषणा – अजित पवार

सकाळी सभागृह सुरू झाल्यानंतर बरंच कामकाज होणे आवश्यक होते. आमदारांना अर्थसंकल्पावर जनतेच्या हिताचे प्रश्न मांडायचे होते. त्याचप्रमाणे विनियोजन विधेयक मंजूर होऊन कामकाज सुरळीतपणे पार पडणे आवश्यक होते. मात्र सकाळी जेव्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आमदार आशीष शेलार भेटले तेव्हा त्यांनी सचिन वाझे यांना बदलल्याशिवाय कामकाज चालू देणार नाही असे सांगितले. तेव्हा अधिवेशनाचे कामकाज सुरळीत पार पडावे म्हणून गृहमंत्री अनिल देशमुख आणि संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी सभागृहात सचिन वाझे यांची बदली केल्याचे जाहीर केले असे अजित पवार यांनी सांगितले.

विरोधकांसारखा आततायीपणा आम्ही केला नाही

मोहन डेलकर यांचे कुटुंबीय आमच्याकडे आल्यानंतर त्यांचे स्टेटमेंट घेतलं गेलं. आम्हीसुद्धा राजकीय चष्म्यातून बघितलं असतं तर काहीतरी सापडलं म्हणून गुन्हा दाखल केला असता. पण आम्ही आततायीपणा केला नाही. हे जे तारतम्य आमच्याकडे आहे ते विरोधकांकडे असायला हवे होते असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला. विरोधी पक्षनेत्यांकडे सीडीआर आहे हाही गंभीर गुन्हा आहे. तो सीडीआर आमच्याकडे द्या हेही सांगितले असून याचीही चौकशी सुरू आहे असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

सचिन वाझे यांचा शिवसेनेशी संबंध नाही

साधारण 2008 साली सचिव वाझे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. पण त्यांनी शिवसेनेच्या सदस्यत्वाचे नुतनीकरणही केलेले नाही. त्यानंतर शिवसेनेशी त्यांचा थेट संबंध आलेले नाही. पण खासदार डेलकर यांनी आत्महत्या केली त्यात ज्यांचं नाव येतंय ते यांच्या गुजरात सरकारमध्ये मंत्री होते. तसं सचिन वाझे आमचा कोणी मंत्री नव्हता किंवा नेताही नाही. त्यामुळे जे काही विषय आहेत ते निपक्षपातीपणे बघण्याचा चष्मा लावा. उगाच कारण नसताना एखाद्याला धरायचं हे योग्य नाही. विधानसभेत जी चर्चा झाली त्याच्यामध्ये सचिन वाझेचं नाव का घेताय, कारण त्या एकाला बेडय़ा घालून संशयित म्हणून घेऊन गेले म्हणून, असा सवाल मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी विरोधकांना केला.

विरोधकांची तपास यंत्रणा सक्षम असेल  तर पोलीस यंत्रणा हवीच कशाला?

एखादा गुन्हा किंवा घटना घडल्यानंतर तिचा तपास करणाऱया पोलीसांकडे एटीएस तसेच अनेक विभाग आहेत. जर विरोधी पक्षांकडेच सर्व माहिती येत असेल, यांची तपास यंत्रणा एवढी सक्षम असेल तर पोलीस वगैरे सर्वच रद्द करा आणि सगळा कारभार यांना करू द्या. झाल्या झाल्या सगळी माहिती यांच्याकडे येत असेल म्हणजे यांची तपास यंत्रणा भारी आहे. सगळे डॉक्युमेंट यांच्याकडे आहेत म्हणून निर्णय घ्यायचा का, असा सवालही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला.

रिफायनरी नाणारला होणार नाही

रिफायनरी प्रकल्प नाणरला करण्याबाबत तिथल्या स्थानिक जनतेचा विरोध असल्यामुळे आम्ही तो प्रकल्प तिथून रद्द करण्याचा निर्णय घेतला. ज्यांनी जमीन तिथे खरेदी केली तेही येऊन भेटले तेव्हा त्यांनाही आम्ही येथील स्थानिक जनतेशी बांधील असल्याचे सांगितले. त्यामुळे आता नाणार रिफायनरी तिथे होणार नाही. पर्यावरण हा मोठा भाग आहे. रिफायनरीसाठी योग्य जागा सरकारकडे आहे. तेथील जनतेचा जर रिफायनरीला विरोध नसेल तर तिथे हा प्रकल्प होईल. त्यामुळे आता या रिफायनरीला नाणार म्हणू नका, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

सचिन वाझे यांची बदली

अँटिलिया बंगल्याजवळ सापडलेल्या स्फोटकांचा तपास राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) करीत आहे तर मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा आणि त्यांच्या पत्नीने दिलेल्या जबाबासंदर्भातील तपास हा दहशतवादविरोधी पथक (एटीएस) करीत आहे. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची गुन्हे शाखेतून बदली करण्यात आली असून या प्रकरणात कुणालाही पाठीशी घालणार नाही, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. राज्यात कायदा-सुव्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान परिषदेत दिली.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था या विषयावर नियम 260 अन्वये विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावावर उत्तर देताना गृहमंत्री देशमुख बोलत होते. दरम्यान, पोलीस अधिकारी वाझे यांना निलंबित  करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. वाझे यांना निलंबित करा, वाझे हेच हिरेन यांच्या मृत्यूला कारणीभूत आहेत, सरकार वाझे यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप दरेकर यांनी केला. जोपर्यंत वाझेला निलंबित केले जात नाही तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा देत विरोधकांनी परिषदेत गोंधळ घातला. त्यामुळे सुरुवातीला 5 मिनिटे आणि नंतर 10 मिनिटांसाठी सभागृह तहकूब करण्यात आले.

…तर कागदपत्रे द्या, पुरावे द्या

विधानसभेतही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांना निलंबित करण्याची मागणी आज केली. दरम्यान, वाझे यांची गुन्हे शाखेतून बदली करण्यात आली असून त्यांच्याविरोधात किंवा या प्रकरणासंदर्भात काही कागदपत्रे किंवा पुरावे असतील तर ते आमच्याकडे द्या, आम्ही योग्य ती कारवाई करू, असे स्पष्टीकरण संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी दिले.

उपसभापतींची विरोधकांना समज

सचिन वाझे यांच्या निलंबनावरून गोंधळ घालणाऱया विरोधकांना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱहे यांनी चांगलीच समज दिली. गोंधळ थांबवण्यास सांगत ‘सरकार चौकशी करत आहे. जे कोणी चौकशीत दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. पण त्यासाठी सभागृहात गोंधळ घालणे योग्य नाही. तसेच विरोधी पक्षनेते पद हे जबाबदार पद आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर यांनी सभागृहात चुकीचे मुद्दे मांडू नयेत,’ असेही स्पष्ट केले.